अनघा निकम-मगदूम
केंद्र किंवा राज्य शासनाने घोषित केलेल्या योजना किंवा घोषित केलेले कार्यक्रम हे राबवण्यासाठीच असतात आणि ते योग्य पद्धतीने राबवण्याची जबाबदारी त्या त्या संबंधित विभागाकडे आणि त्या विभागाच्या अधिकाऱ्याकडे असते हे आपसूकच आलं; परंतु ती योजना किंवा त्या संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यामागची एखाद्या अधिकाऱ्याची किंवा प्रशासनाची असलेली सकारात्मकता किंवा इच्छाशक्ती ही जास्त महत्त्वाची असते. त्यातून हे कार्यक्रम किंवा योजना प्रभाविपणे राबविले जातात. रत्नागिरीचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी नुकताच आपल्या पदावर कार्यभार स्वीकारला आहे आणि आल्या आल्या त्यांच्यासमोर ‘जागतिक हात धुवा दिन’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे उद्दिष्ट होते. अर्थात सरकारी उपक्रम असतानाच नूतन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यात विशेष लक्ष घालून हा ‘जागतिक हात धुवा दिवस’ एका उपक्रमाप्रमाणे जिल्ह्यात आणि विशेषतः शाळांमधून राबविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन ते स्वतः ‘हात स्वच्छ धुवा दिन’ का पाळावा, हात कसे स्वच्छ ठेवावे? याचे धडे विद्यार्थ्यांना देत आहेत.
खरं तर स्वच्छता हा आपल्या आयुष्यातला कितीतरी महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहे; किंबहुना ती दैनंदिन गरज आहे, असं म्हटलं पाहिजे आणि त्याची सुरुवात स्वस्वच्छतेपासून होते, असं म्हणूया. त्यातही आपल्या शरीराचे जे सर्वाधिक कार्यरत अवयव आहेत, त्यातील महत्त्वाचे असलेले आपले हात स्वच्छ धुतले पाहिजेत. कारण हा एक संस्कार आहे, हे या ‘जागतिक हात धुवा दिना’च्या माध्यमातून लहान मुलांमध्ये, तरुण पिढीमध्ये रुजवला पाहिजे, राबवला पाहिजे, अशी यामागची संकल्पना आहे. ती संकल्पना कीर्तीकिरण पुजार ह्या नव्या उमलत्या पिढीला आवर्जून सांगत आहेत. त्यांच्या मनामध्ये रुजवत आहेत. प्रात्यक्षिक करून ते या गोष्टी या मुलांना सांगत आहेत. ही निश्चितच एक चांगली गोष्ट आहे. कारण स्वच्छता महत्त्वाची आहेच.
स्व-स्वच्छता महत्त्वाची आहे. पण स्वच्छता हा विषय स्वतःपुरता किंवा आपल्या कुटुंबापुरता मर्यादित नाही, तर सार्वजनिक स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे. म्हणजे स्वच्छता हा विषय आता वैश्विकसुद्धा झाला आहे असं म्हटलं, तर काय वावगं ठरणार नाही.
जेव्हा ही वसुंधरा निर्माण झाली त्यावेळेला ती अतिशय सुंदर, स्वच्छ होती. पण हळूहळू मनुष्य उत्क्रांत होत गेला, यशस्वी होत गेला आणि त्याने स्वतःला त्यातून प्रगत करण्यास सुरुवात केली. पण, एकीकडे प्रगतीची कास धरतानाच मनुष्य आपल्या समाजाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या विसरू लागले आहेत. प्रगती करता करता, यशस्वी होता होता त्याच्याकडून स्वच्छतेचे नियम पाळणे हे त्रासाचे होऊ लागले आहेत. मात्र त्याचे परिणाम आता आपण भोगायला लागलो आहोत.
जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे त्यांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झालाय, त्यातून नवी नगरे, गावे तयार होत आहेत. अशा वाढत्या लोकसंख्येत प्रत्येकाच्या घरातला कचरा, मलमूत्र निस्सारण हे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. दररोज प्रत्येक गावात, शहरात तयार होणारा घनकचरा ही खूप मोठी आता समस्या होऊ लागली आहे. सुंदर, हिरवाईने नटलेल्या वसुंधरेच्या जागी कचऱ्याचे डोंगर डोळ्यांसमोर येऊ लागले आहेत. अनेक अभ्यासकांनी दररोज तयार होणार कचरा यावर योग्य उत्तर शोधलं नाही, तर येत्या काळात ही पृथ्वी एक कचराकुंडी होईल, असं सांगून ठेवलंय. असा मोठ्या प्रमाणात कचरा आता हळूहळू या पृथ्वीवर साठू लागलाय. त्यात प्लास्टिक हे एक महाभयंकर संकट या पृथ्वीवर आलं आणि ते नष्ट कसं करायचं किंवा ते दूर कसं करायचं? याचं ठोस उत्तर कोणाकडेच नाही.
प्लास्टिकने आपलं संपूर्ण जीवन व्यापून टाकलं आहे. आज प्लास्टिक नसेल, तर कुठलीही गोष्ट होत नाही. प्लास्टिक वेगवेगळ्या रूपाने आपल्यासमोर येत राहते आणि मग त्याचे विघटन कसं करायचं? हा प्रश्न मात्र आपण अद्याप सोडवला नाहीये. जसं अभिमन्यूला चक्रव्युहात शिरायचे माहिती होते, पण त्यातून बाहेर पडायचा मार्ग माहिती नव्हता. तसंच यां प्लास्टिकच्या बाबतीत म्हटलं पाहिजे. आज प्लास्टिकने मानवाचं आयुष्य व्यापून टाकलं आहे. प्रत्येक गोष्टीत आपल्याला प्लास्टिक लागतं. मात्र ते नष्टच होत नसल्यामुळे ते वापरून झाल्यानंतर अनेक ठिकाणी साचून राहतं. आज समुद्रकिनारेच नव्हे, तर समुद्राच्या पोटातसुद्धा अनेक टन प्लास्टिक गोळा झाले आहे. अनेक नदी-नाले, वाहते ओढे याच्यामधून प्लास्टिक वाहते आहे आणि गटार तुंबून राहिलेत आणि ही तुंबलेली गटारे, ओसंडून वाहणाऱ्या कचराकुंड्या, एका बाजूला गावाबाहेर फेकलेला कचरा हे अस्वच्छता निर्माण करत आहेत. यातूनच रोगराई पसरते आहे. मनुष्य जीवनावर त्याचा परिणाम होत आहे. प्लास्टिक हा अस्वच्छतेचाच एक भाग आहे आणि यातूनच मोठ्या प्रमाणात कचरा होतो.
प्लास्टिकसोबतच अशा अनेक गोष्टी किंवा सवयी आपल्याला स्वच्छतेपासून दूर करत आहेत. रस्त्यावर जाताना एखादी आईच आपल्या मुलाच्या हातातला खाऊचा कागद रस्त्यावर फेकताना दिसते. तेच संस्कार मुलांवर होत असतात. प्लास्टिक बाटल्या सर्रास कुठेही फेकल्या जातात. घनकचरा प्रकल्प उभारण्यापूर्वीच त्याला विरोध होऊन ते वर्षानुवर्षे रखडले जातात. यातूनच समस्या अधिक वाढतात. खरं तर स्वच्छता हा एक संस्कार आहे. हा संस्कार वैश्विक झाला पाहिजे. स्वच्छतेचे महत्त्व पटलं पाहिजे, ते अंगीकारले पाहिजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताला सर्वसंपन्न, महासत्ता बनविण्याचं स्वप्न घेऊन या देशाचे पंतप्रधान झाले. मात्र यातून नवा भारत घडवताना त्यांनी सर्वात आधी स्वच्छतेला महत्त्व दिले आहे. त्यातून स्वच्छ भारत अभियान आणि अन्य उपक्रम सुरू झालेत. आपला देश स्वच्छ होतोय, हा संस्कार रुजतोय. अगदी छोटी वाटणारी ही गोष्ट खूप मोठे काम करणार आहे.
पंतप्रधान मोदींचे हे स्वच्छ भारताचे स्वप्न साकारताना आपल्याला अजून अनेक प्रश्न सोडवायचे आहेत. तुंबलेली गटारे, साचलेल्या कचराकुंड्या, प्रक्रिया न झालेला कचरा, अविघटनशील प्लास्टिक, कचरा अशा अनेक गोष्टी कचरा समस्येच्या रूपाने उभ्या आहेत. त्याचे निराकरण करताना आधी स्वतःची मानसिकता बदलणे, स्वतःच्या सवयीमध्ये बदल करणे जास्त महत्त्वाचे आहे, तरच ही पृथ्वी, आपला देश, गाव आणि घर स्वच्छ, सुंदर मंदिर होईल.