रमेश तांबे
एक होतं गाव, त्याचं नाव होतं अक्रमपूर. अक्रमपुरात राजा होता राणी होती. माणसे होती, प्राणी, पक्षी होते. पण गाव फार विचित्र होतं. सगळं गाव दिवसभर झोपायचं आणि रात्र झाली की जागायचं. सगळ्या माणसांची घरं होती झाडावर अन् पक्ष्यांची घरं होती जमिनीवर. अक्रमपूरची माणसं रस्त्यावरून चालताना उड्या मारत चालायची, उंच उंच झाडावर घरं बांधायची. झाडावर चढण्यासाठी होत्या सापाच्या शिड्या, प्रत्येकाच्या घराला दोन दोन माड्या.
गावातली मोठी माणसं शाळेत जायची, मुलं मात्र सारी रात्रभर काम करायची. गावात भरपूर विहिरी होत्या. पण त्या साऱ्या दुधाने भरलेल्या. दूध हेच होतं त्यांचं पाणी, दुधावरच लिहायचे ते आपली गाणी. त्यामुळे गावातली झाडं सगळी पांढरी शुभ्र, पानं पांढरी, फुलं पांढरी आणि फळंही पांढरीच! शेतात गहू करा, नाहीतर बाजरी पेरा. कलिंगड पिकवा नाहीतर टोमॅटो लावा, पांढऱ्याशिवाय दुसरा रंगच नाही.
अक्रमपूरचे राजा-राणी एका मोठ्या राजवाड्यात राहायचे अन् तो राजवाडा होता एका उंच नारळाच्या झाडावर. राजा-राणीला फिरवण्यासाठी होता एक मोर, ते दोघे मोरावर बसायचे अन् गावभर फिरायचे. मोर खूप चांगला होता. राजा-राणीचा लाडका होता. तो राजा-राणीची खूप सेवा करायचा. त्यांना पंखाने वारा घालायचा. त्यांच्यासमोर पिसारा फुलवून नाचायचा. गोड आवाजात गाणीसुद्धा गायचा. राजा सांगेल, तेव्हा लगेच हजर व्हायचा. राणीचा मोरावर खूप जीव होता. मुलासारखे प्रेम होते.
पण एकदा काय झालं. लाडका मोर पडला आजारी. त्याच्या पिसाऱ्यातले पंख लागले गळू, मातीत पडून लागले मळू. मळलेले पंख लोकांनी उचलले सगळ्यांना ते फारच आवडले. कुणीच मोराचे पीस कधी पाहिले नव्हते. त्यावरून हात कधी फिरवले नव्हते. पण मोराचं उडणं बंद झालं अन् राजा-राणीचं फिरणं बंद झालं. आठ दिवस झाले, लोकांना राजा-राणीचं दर्शन नाही झालं. आता काय करायचे? नारळाच्या झाडावरून राजा-राणीला खाली कसे आणायचे? मग राजाचा प्रधान गेला गरुडाकडे अन् म्हणाला…
लाडका मोर पडला आजारी
राजा-राणी अडकले महाली,
त्यांची तू सुटका कर
राजा-राणीची सेवा कर!
गरुड म्हणाला, ‘मीसुद्धा आहे पक्ष्यांचा राजा, मी नाही करणार असली हलकी कामं’ असं म्हणून आपले दोन मोठे पंख हलवत गेला उडून दूर दूर…
नंतर प्रधान गेला शहामृगाकडे, अन् म्हणाला,
लाडका मोर पडला आजारी
राजा-राणी अडकले महाली,
त्यांची तू सुटका कर
राजा-राणीची सेवा कर!
शहामृग म्हणाला, ‘नाही बाबा… नाही जमायचं मला. माझ्या पंखात नाही एवढं बळ’ असं म्हणून गेला टणाटण उड्या मारत.
आता प्रधान गेला पोपटाकडे… अन् म्हणाला…
लाडका मोर पडला आजारी
राजा-राणी अडकले महाली,
त्यांची तू सुटका कर
राजा-राणीची सेवा कर!
तसा पोपट म्हणाला, ‘माझं काम गप्पा मारणं, मिरच्या कैऱ्या खात फिरणं मला नाही वेळ!
असं करता करता प्रधान खूप फिरला. पण मदतीला कुणीच तयार होईना. बिचारा प्रधान दमून गेला. एका झाडाखाली विचार करत बसला. तेवढ्यात त्याच झाडावर चिमणी, कावळा येऊन बसले आणि बोलू लागले.
लाडका मोर पडला आजारी
राजा-राणी अडकले महाली,
मदत त्यांना आपण करूया
राजा-राणीला आणायला जाऊया…
चिमणी, कावळ्याचे बोलणं ऐकून प्रधान पडला विचारत. ही चिवचिव चिमणी अन् कावकाव कावळा, कुठे राणीचा लाडका मोर अन् कुठे हा काळाकुट्ट कावळा! प्रधान डोक्याला हात लावून बसला. ते चिमणीने पाहिलं आणि प्रधानाला म्हणाली.
‘प्रधानजी प्रधानजी ऐका जरा,
राजा-राणीचा विचार तरी करा…
कोण काळे कोण गोरे,
जुनाट विचार विसरा सारे…
आम्ही जातो राजवाड्यात
राजा-राणीच्या मोठ्या महालात,
घेऊन येतो त्यांना खाली
आनंदित होईल जनता सारी!
शेवटी प्रधान कसाबसा तयार झाला. कारण चिमणी, कावळ्याशिवाय मदतीला होतंच कोण? परवानगी मिळताच कावळा, चिमणी भूर्र उडाले नारळाच्या झाडावर जाऊन पोहोचले. तिथं मोठा राजवाडा होता. सुंदर राजवाडा बघून दोघांना आनंद झाला. पण कावळा राजवाड्यात गेलाच नाही. तो चिमणीला म्हणाला,
‘जा बाई तू राजाच्या महालात
निरोप सांग माझा त्यांच्या कानात,
मदत करायला आलो तुम्हाला
वेळ नका दवडू पाठीवर बसायला!’
चिमणीचा निरोप ऐकून राजा-राणी पटकन बाहेर आले. कावळ्याने त्यांना आपली ‘मान’ हलवून प्रणाम केला. मग राजा-राणी बसले कावळ्याच्या पाठीवर. एका मिनिटात आले सारे जमिनीवर. राजा-राणीला पाहताच लोकांना खूप आनंद झाला. मग राजाने कावळ्याचा भव्य सत्कार केला. चिमणीलासुद्धा मोठे बक्षीस मिळाले. नंतर राजाने आणखी एक काम केले. बाकीच्या सर्व पक्ष्यांना जंगलात हाकलून दिले आणि कावळा, चिमणी आपल्यासोबत राहू लागले!