लखनौ : उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात शुक्रवारी भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यू कारची कंटेनरला धडक बसून झालेल्या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातापूर्वी हे चार तरुण फेसबुक पेजवर लाईव्ह झाले होते. या लाइव्ह व्हिडिओमध्ये एक तरुण चौघेही मरणार असल्याचे म्हणताना ऐकू येत आहे. मृत्युमुखी पडलेले चार जण बिहारचे होते.
या अपघाताबाबतचा एक लाइव्ह व्हिडिओ समोर आला आहे, ज्यावरून हे स्पष्ट आहे की बीएमडब्ल्यूचा वेग २३० किमी प्रतितास होता. अपघातापूर्वी फेसबुक लाईव्ह व्हिडिओमध्ये आवाज येत आहे की ‘आज चारो मरेंगे’. त्यानंतर काही वेळातच अपघात झाला आणि गाडीत बसलेले सर्वजण ठार झाले.
कारचा वेग २३० पर्यंत पोहोचला होता. अपघाताचा संपूर्ण व्हिडीओ फेसबुकवर अपलोड झाला नाही. मात्र ही टक्कर किती भीषण झाली असावी, याचा अंदाज नक्कीच लावता येईल. देहरी शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर डॉ. निर्मलकुमार कुशवाह यांचा मुलगा डॉ. आनंद प्रकाश हे त्यांच्या मित्रांसोबत जात होते. दरम्यान, उत्तर प्रदेशातील सुलतानपूरजवळ एक अपघात झाला.
नारायण मेडिकल हॉस्पिटल कॉलेजमध्ये कार्यरत असलेले डॉ. आनंद प्रकाश हे त्यांच्या बीएमडब्ल्यू कारमधून नातेवाईक आणि दोन मित्रांसह दिल्लीला जात होते. आझमगड आणि सुलतानपूरजवळ एक्स्प्रेस हायवेवर उभ्या असलेल्या कंटेनरला बीएमडब्ल्यू कारची भीषण टक्कर झाली. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला.