मुंबई (वार्ताहर) : मुंबईत डोळ्यांची साथ आली असून पालिकेने ने मुंबईकरांना लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. डोळ्यांतून पाणी आणि घाण येणे, डोळे लाल होणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्यालाही संसर्ग होतो. दरम्यान डोळ्यांच्या या साथीमुळे पालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना, पावसाळी साथीचे आजार आता नियंत्रणात येत असताना डोळ्यांच्या साथीने डोके वर काढले आहे. डोळ्यांतून पाणी आणि घाण येणे, डोळे लाल होणे ही या आजाराची लक्षणे आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णांनी बाहेर जाणे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांकडून मुंबईकरांना देण्यात येत आहे. तसेच या साथीचे प्रमाण वाढत असल्याने रुग्णांनी घरी बसून आराम करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
गेल्या आठवड्यापासून मुंबईत डोळ्यांची साथ पसरू लागली आहे. या प्रकारात डोळ्यांना सूज येते, अशीच काहीशी लक्षणे मुंबईकरांमध्ये दिसून येत आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या, असे आवाहन रुग्णांना तज्ज्ञांकडून केले जात आहे. डोळे येण्याचा संसर्ग सर्वात आधी एकाच डोळ्याला होतो. पण एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्यालाही त्याचा संसर्ग होतोच. एकदा व्यक्तीचे डोळे येऊन गेले की, पुन्हा त्याच व्यक्तीला याचा संसर्ग होत नाही, असे अनेकांना वाटते म्हणून अनेकजण निष्काळजीपणा करतात. पण असे नाही, एकदा संसर्ग होऊन गेल्यानंतरही पुन्हा त्याच व्यक्तीला संसर्ग होऊन डोळे येऊ शकतात, असे तज्ज्ञांकडून सांगितले जाते.