मुंबई : सध्या राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजीपाला पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसाने टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या बाजारपेठेत टोमॅटोची आवक घटली आहे. याचा परिणाम दरांवर झाला आहे.
सध्या टोमॅटोच्या दरात १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. याचा राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये टोमॅटोचे दर हे प्रतिकिलो ३५ ते ४० रुपयांवर गेले असून, किरकोळ मार्केटमध्ये हाच दर ६० ते ७० रुपये प्रतिकिलो झाला आहे. एपीएमसी घाऊक बाजारात टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. परतीचा पाऊस सुरु असल्यामुळे टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
पावसामुळे टोमॅटोचे ५० टक्के उत्पादन घटले आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारात टोमॅटोचे दर १० ते १५ रुपयांनी वाढले आहेत. मागील आठवड्यात ३० ते ३२ रुपये प्रति किलो दरानं उपलब्ध असलेले टोमॅटो आता ३५ ते ४५ रुपयांवर विकले जात आहेत. सततच्या पावसामुळं आवक घटल्यानं भाजीपाल्याचे दर महागले आहेत.