Thursday, July 18, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखपोटनिवडणुकीत उद्धव गटाचा फुगा फुटणार

पोटनिवडणुकीत उद्धव गटाचा फुगा फुटणार

शिवसेनेत अभूतपूर्व उठाव झाल्यानंतर तसेच मूळचे नाव आणि हक्काची निशाणी गमावावी लागल्यानंतर होऊ घातलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीला फार मोठे महत्त्व आले आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी ठाकरे गटाने रमेश लटके यांच्या निधनामुळे मतदारसंघातील मतदारांमध्ये निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा उठविण्यासाठी त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे, तर अंधेरी निवडणूक भाजप लढणार की शिंदे गट? याबाबत संभ्रम होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करून मुरजी पटेल हेच निवडणूक लढणार असल्याचे नक्की केले. भाजप आणि शिंदे गटाच्या युतीचे उमेदवार म्हणून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर दोन्ही गटांकडून फार मोठा गाजावाजा आणि जोरदार शक्तिप्रदर्शन करत शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांनी, तर भाजपच्या वतीने मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडणुकीचे महत्त्व जाणून मुरजी पटेल यांचा अर्ज दाखल करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार नितेश राणे हे नेते सोबत आले होते, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या ऋतुजा लटके यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे, अनिल परब, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप आदी नेते उपस्थित होते.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा धुरळा जरी उडाला असला तरी भाजप आणि ठाकरे गटाने सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. ठाकरे गटाकडून सावधगिरी म्हणून संदीप नाईक यांचाही निवडणूक अर्ज दाखल करण्यात आला आहे, तर भाजपनेही मुरजी पटेल यांचे दोन अर्ज दाखल केले आहेत. एकूणच ही निवडणूक जाहीर झाल्याच्या दिवसापासून राजकीय शह-काटशह सुरू असल्याचे दिसून आले. शिवसेनेच्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक असून, मतदार कोणाला कौल देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तत्पूर्वी ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या महापालिकेतील सेवेचा राजीनामा देण्याचे नाट्य काही काळ रंगले होते किंवा रंगविले गेले होते. कारण लटके यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचा पालिकेतील राजीनामा आणि त्या अानुषंगाने पुढे येणाऱ्या सर्व बाबी यांची जबाबदारी घेणारे उद्धव गटाचे अनिल परब, विश्वनाथ महाडेश्वर आदी मंडळींनी आधीच पूर्णत्वास न्यायला हव्या होत्या. ते त्यांचे कर्तव्यच होते. कारण ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याचा प्रश्न हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या मुदतीपर्यंत नाहक ताणला गेला नसता. तसेच त्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर उगाचच चिखलफेक करण्याचा आपला नेहमीचा डाव उद्धव गटाला खेळता आला नसता. म्हणूनच त्यांनी राजीनामा नाट्य घडवून आणले असावे, अशी शक्यता दिसत आहे. हे प्रकरण नाहक कोर्टात नेण्यात आले आणि अखेर प्रशासनाने लटके यांचा राजीनामा स्वीकारला, तर दुसरीकडे, गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना – भाजप युती असल्याने ही जागा शिवसेनेच्या रमेश लटके यांच्यासाठी सोडण्यात आली होती. त्यावेळी भाजपच्या मुरजी पटेल यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. यावेळी अंधेरी पूर्वच्या या जागेवर शिंदे गटानेही दावा केला होता. त्यामुळे मुरजी पटेल कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार? याबद्दल उत्सुकता होती. शेवटी अंधेरी पूर्वची जागा ही भाजपला सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर त्यांच्या उमेदवारीचाही मार्ग मोकळा झाला. आता अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

दोन्ही गटांकडून जोरदार टीका-टिप्पणी करण्यात येत आहे. दोन्ही उमेदवारांनी निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. तसेच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झाडल्या जात आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव यांनी रमेश लटके यांना जिवंतपणी त्रास दिल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला व रमेश लटके आज जिवंत असते, तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत उभे असते, असा दावाही त्यांनी केला.

अंधेरीची पोटनिवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना असलेला शिंदे गट – भाजपसाठी लिटमस टेस्ट आहे. कारण यापुढे सर्वांसाठी महत्त्वाच्या अशा मुंबई महापालिकेची निवडणूक येऊ घातली आहे. अंधेरीच्या या निवडणुकीच्या निकालानंतर जनतेच्या मनात नेमके काय आहे? याचा सुगावा लागू शकतो. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप – शिंदे गटाच्या युतीने केलेले जोरदार शक्तिप्रदर्शन आणि स्थानिकांचा पटेल यांना मिळत असलेला पाठिंबा पाहिला असता, या पोटनिवडणुकीत उद्धव गटाचा फुगा फुटणार, यावर जणू शिक्कामोर्तबच झाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -