मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु, ठाकरे गटाने त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदवला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुरजी पटेल यांना ६ वर्ष निवडणूक लढण्यास अपात्र ठरविले असतानादेखील उमेदवारी अर्ज कसा काय स्विकारला, असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. तसेच मुरजी पटेल यांचा निवडणूक अर्ज रद्द करण्यासाठी अंधेरी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रारही दाखल केली आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक व ठाकरे गटातर्फे अंधेरी पोटनिवडणुकीसाठी पर्यायी उमेदवारी अर्ज दाखल करणारे संदीप नाईक यांनी आज पत्रकार परिषद घेत मुरजी पटेलांवर गंभीर आरोप केले.
मुरजी पटेल यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खोटे कागदपत्र सादर केल्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार महानगरपालिकेने सहा वर्षाकरिता निवडणूक लढण्यास अपात्र ठरविले आहे. असे असतानासुद्दा त्यांचा निवडणुकीचा अर्ज कोणत्या नियमानुसार आपण स्विकारलात? असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला आहे.
तसेच, दिलेल्या माहितीची शहानिशा करुन मुरजी पटेल यांचा अर्ज रद्द करावा, अशी विनंतीदेखील नाईक यांनी केली आहे.
तसेच, अंधेरी पोटनिवडणुकीतील भाजप व शिंदे गटाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल आहेत. मात्र, उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी स्वत:वर दाखल गुन्ह्यांची माहिती लपवली, असा गंभीर आरोपही नाईक यांनी केला आहे.