Wednesday, April 30, 2025

देशमहत्वाची बातमी

अधिकाऱ्यांचे पत्नीपेक्षा फाईलवर अधिक प्रेम : नितीन गडकरी

अधिकाऱ्यांचे पत्नीपेक्षा फाईलवर अधिक प्रेम : नितीन गडकरी

नागपूर : शासकीय अधिकारी हे पत्नी पेक्षा फाईलवर जास्त प्रेम करतात आणि महाराष्ट्रात काही आमदार - खासदार आपल्या प्रभावाने विकासकामे थांबवतात, असा गंभीर आरोप केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.

इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या वतीने मॉनकॉन या खाण विषयासंदर्भातल्या परिषदेत गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी शासकीय अधिकारी हे पत्नी पेक्षा फाईलवर जास्त प्रेम करतात त्यामुळे कित्येक वर्ष ते विविध विकास कामांच्या फाईल अडवून ठेवतात, अशा लोकांच्या कामांचे ऑडिट व्हायला हवे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

गडकरींनी मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वे दोन वर्षांत मी बांधू शकलो, एक लाख कोटींचा प्रोजेक्ट कमी वेळात पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पण माझ्या घरासमोरचा एक किलोमीटरचा रस्ता गेल्या कित्येक वर्षांपासून पूर्ण होत नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. गडकरींच्या घरासमोरचा केळीबाग रोड तयार करण्यासाठी ११ वर्षात ३० बैठका घेतल्या. तरी हे काम काही पूर्ण होत नाही, अशी माहितीही त्यांनी यावेळी उघड केली.

विकासकामे किंवा उद्योगाला वन आणि पर्यावरण परवानग्या मिळवण्यासाठी मोठ्या अडचणी येतात. वनविभागाकडे अनेक फाईल्स प्रलंबित आहेत. त्या तातडीने मार्गी लावा अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी सूचना त्यांनी यावेळी दिली. असे सांगत असताना महाराष्ट्रात काही आमदार आणि खासदार आपल्या प्रभावाने विकासकामे थांबवतात, असा टोलाही गडकरींनी लोकप्रतिनिधींना लगावला.

विदर्भाच्या विकासासाठी परिषदांचे आयोजन करा. सोबतच त्यात झालेल्या चर्चेला मुर्तस्वरुप देण्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. परिषदांमध्ये फोटोसेशन झाले की काम संपले, असे होत नसते, अशा शब्दात कानपिचक्याही त्यांनी अधिकाऱ्यांना मारल्या.

Comments
Add Comment