बोईसर (वार्ताहर) : बोईसरमध्ये कपड्याच्या दुकानातून चोरी करणाऱ्या गुजरातमधील लेडी गँगला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास बोईसरमधील ओसवाल एंपायर येथील व्हाईट हाऊस या तयार कपड्यांच्या दुकानाबाहेर काही अनोळखी महिला संशयास्पद हालचाली करत असताना दिसून आल्या. याप्रकरणी एका व्यक्तीने काही तरी संशयास्पद घडत असल्याची माहिती दुकानाच्या मालकाला फोन करून देताच दुकान मालकाने तातडीने दुकानाकडे धाव घेतली. मात्र मालक दुकानात पोहचण्याच्या आधीच सर्व महिला पसार झाल्या होत्या. दुकानाचे शटर खाली वाकवल्याचे दिसताच दुकान मालकाने याप्रकरणी बोईसर पोलिसांना खबर दिली.
पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तातडीने सर्व प्रमुख रस्त्यांवर नाकेबंदी लावून तपासणी सुरू केली असता, चोरी करून पळण्याच्या बेतात असलेल्या सहा महिलांना बोईसर रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेण्यात आले. या सर्व महिला मूळच्या गुजरातमधील अहमदाबादच्या असून रेल्वे स्टेशनवर राहून चोरी करण्यात सराईत आहेत.
यामध्ये टोळीतील एक महिलेने दुकानाच्या आत शिरून टेबलच्या खणात असलेली ३ हजार रोख रक्कम चोरली होती. तर इतर महिला या दुकानाच्या बाहेर पहारा देत बसलेल्या होत्या. चोरी झाल्यानंतर अवघ्या तासाभरातच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खोंडे, पोलीस नाईक महेश कडू यांच्या पथकाने या महिल्यांच्या टोळीला बोईसर रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेत अटक केली आहे.