वाडा (वार्ताहर) : तालुक्यातील खरिवली गावातील ग्रामपंचायत निवडणुकीमुळे गावातील वातावरण चांगलेच तापले आहे. गावातील काही लोकांकडून प्रतिस्पर्धी उमेदवाराला हरविण्यासाठी स्मशानभूमीत रात्रीच्या सुमारास जादूटोणा करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित लोकांना गावातील काही तरूणांनी रंगेहाथ पकडले. २१ व्या शतकातही असे धक्कादायक प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शुक्रवार रात्री ११वाजण्याच्या सुमारास खरिवली गावाच्या बाहेर असलेल्या स्मशानभुमीमध्ये आरोपींकडून गोल आकाराचे वर्तुळ काढून त्यामध्ये अबीर, गुलाल, शेंदूर, कुंकू टाकून भगव्या रंगाची चांदणी तयार त्यामध्ये लिंबु, काळी बाहुली, अंडी, टाचण्या काळादोरा आदी साहित्य टाकून आघोरी कृत्य सुरू होते. यावेळी गावातील काही तरूणांनी त्यांना रंगेहाथ पकडले. त्यामुळे दोन गटात थोडी बाचाबाची झाली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच आरोपींनी तेथून पळ काढला.
या प्रकाराची पाहणी करून पोलिसांनी एम.एच.०४ एफ.एफ.७८६१ ही इको गाडी तर एम.एच.४८बी.क्यू ९८७२ अॅक्टिव्हा ही दोन वाहने ताब्यात घेतली. तसेच सागर गायकर, कैलास गायकर, शिवनाथ गायकर, संदेश गायकर, महेश जाधव, संतोष जाधव, विश्वास जाधव, चेतन जाधव, विकास ठाकरे यांच्यावर वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दशरथ पाटील करीत आहेत.