सिडनी (वृत्तसंस्था) : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाने ऑस्ट्रेलियात आयोजित केलेल्या इनडोअर क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या पात्रता सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर २८ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान मिळवले. भारताने दुसऱ्या पात्रता सामन्यात श्रीलंकेवर ४० धावांनी विजय मिळवला. आता अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी भारताला न्यूझीलंडला पराभूत करावे लागेल. भारतीय संघ प्रथमच पहिल्या तीन संघात पोहचला आहे. त्यामुळे भारतीय इनडोअर क्रिकेटमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
दुसऱ्या पात्रता फेरीच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १०९ धावा केल्या व एक कडवे आव्हान श्रीलंकेसमोर ठेवले. मोठ्या धावसंख्येच्या दबावाखाली श्रीलंकेचा डाव शेवटपर्यंत सावरलाच नाही. या सामन्यात विजय मिळवणे दोन्ही संघांना आवश्यक होते. त्यामुळेच भारतीय संघाने सुरवातीपासूनच जिंकू किंवा मरू या थाटात खेळत विजयश्री खेचून आणली.
१६ षटकांच्या सामन्यात भारताच्या सलामवीरांनी या सामन्यात चांगली सुरुवात करून दिली. भारताच्या चारही जोड्यांनी अनुक्रमे २५, ३९, २२ व २३ धावांची खेळी करताना एकूण १०९ धावा करत मजबूत स्थिती मिळवली. भारताच्या दुसऱ्या जोडीने जोरदार फटकेबाजी करत भारताला भक्कम स्थिती प्राप्त करून दिली. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या चारही जोड्यांना अनुक्रमे २४, ११, १४ व २० धावांवर रोखत जोरदार विजय साजरा केला. या सामन्यात श्रीलंकेच्या खेळाडूंनी भारताच्या खेळाडूंसमोर हाराकिरी केल्याचे दिसले.
भारताच्या गोलंदाजांनी १६ षटकांत श्रीलंकेच्या एकूण ८ फलंदाजांना बाद केल्याने श्रीलंकेच्या धावफलकातून ४० धावा कमी करता आल्या. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी १६ षटकांत भारताचा एकाच फलंदाज बाद केल्याने भारताच्या धावाफलकतून फक्त ५ धावा कमी झाल्या. एकूणच भारताची फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अतिशय चांगले झाले. त्यामुळेच भारताला मोठा विजय मिळवता आला. या सामन्यात प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार भारताच्या धनुष भास्कर याला देऊन गौरवण्यात आले.