अभय दातार
पूर्वीच्या लेखांत आपण कर्जदाराच्या जबाबदाऱ्या आणि हक्क यांची माहिती घेतली. आता कर्ज फेडल्यानंतर पुढे काय, त्यासंबंधी काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया.
मूळ (original) कागदपत्रे परत घेणे
कर्ज घेताना काही मूळ कागदपत्रे, दस्तावेज बँकांना द्यावे लागतात. कर्जाची परतफेड झाल्यावर बँकांनी ही सर्व कागदपत्रे कर्जदारास कर्ज फेडल्यापासून १५ दिवसांच्या आत परत करणे बंधनकारक आहे. त्यामुळे ही सर्व कागदपत्रे परत घ्यावीत.
बोजा उठवणे : गृह खरेदीसाठी कर्ज घेतल्यास घरावर बँकेचा बोजा (mortgage) असतो. तसेच शेअर्स, म्युच्युअल फंडांची युनिट्स, विमा पॉलिसी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, इत्यादी तारण ठेवून कर्ज घेतल्यास त्यावरही बँकेचा बोजा असतो. हा बोजा उठवल्याचे रितसर पत्र बँकेने देणे आवश्यक आहे. हे पत्र संबंधितांना देऊन हा बोजा उठवल्याची खात्री करून घ्यावी. आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे जरी कर्ज फेडले, तरी जी वस्तू वा मत्ता गहाण ठेवली आहे, तिच्यावर त्याच बँकेकडून घेतलेल्या दुसऱ्या एखाद्या कर्जाचा बोजा असू शकतो आणि ते कर्ज फेडल्याखेरीज बँक बोजा उठवत नाही. त्यामुळे आपण कर्ज घेण्यासाठी ज्या करारपत्रांवर सह्या करतोय, त्यातील अटी समजून घ्याव्यात.
कर्जाच्या खात्याचे स्टेटमेंट : कर्जाच्या खात्याचेही स्टेटमेंट मिळते. आपला ई-मेल बँकेला दिला असेल, तर त्यावरही बँका नियमितपणे ही स्टेटमेंट पाठवतात. कर्जाची परतफेड झाल्यावर साहजिकच शिल्लक रक्कम शून्य दिसायला हवी. त्यासाठी कर्जाच्या खात्याचे शेवटचे स्टेटमेंट
तपासून पाहावे.
पतदर्शक गुणांकन अर्थात क्रेडिट स्कोअर : एका लेखात आपण या गुणांकनाचे महत्त्व पाहिले. त्यावरच भविष्यात कर्ज मिळणे अवलंबून असते. कर्जाची परतफेड झाल्यानंतर आपली बँक ‘सिबिल’ किंवा तत्सम कंपन्यांना तसे कळवते आणि या कंपन्या आपल्या नोंदी अद्ययावत करतात. त्यामुळे कर्ज फेडल्यापासून साधारण महिन्याभरात आपले गुणांकन तपासून पाहावे. रिझर्व्ह बँकेने १ सप्टेंबर, २०१६ रोजी एक परिपत्रक जारी करून ‘कर्जदारास वर्षातून एकदा हे गुणांकन विनाशुल्क उपलब्ध करून द्यावे’ असे पत गुणांकन करणाऱ्या कंपन्यांना सांगितले आहे. याचा लाभ घ्यावा. या कंपन्या काही शुल्क आकारून आपले गुणांकन कितीही वेळा उपलब्ध करून देतात. याची माहिती त्यांच्या संकेतस्थळावर असते.
समझोता करून कर्ज फेडले असेल तर? : कर्ज अजिबात फेडले नाही, तर कर्जदाराच्या पत गुणांकनावर विपरीत परिणाम होतो आणि त्याला भविष्यात इतर कर्जे मिळत नाहीत. एखादे कर्ज काही अडचणींमुळे पूर्णपणे फेडता आले नाही तर बँका कर्जदाराबरोबर काही समझोता करतात. या प्रकारात कर्ज किंवा कर्जावर चढलेले व्याज अथवा दोन्ही, यापैकी काही रक्कम बँका माफ करतात आणि उर्वरित थकबाकीसाठी काही अटींवर परतफेड करायला सांगतात. ही परतफेड अंशत: असल्याने येथेही कर्जदाराचे गुणांकन खालावते. त्यामुळे अशा कर्जदारांनी परतफेड झाल्यावर आपले गुणांकन तपासावे. हे कर्जाच्या बाबतीत जितके लागू आहे तितकेच ते क्रेडिट कार्डावर बाकी असलेल्या रकमेच्या बाबतीतही लागू आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापरही शिस्तबद्धपणे करावा.
विमा : काही प्रकारच्या कर्जात बँका विमा उतरावयाला सांगतात, उदा. गृहकर्ज. भविष्यात काही संकट आले तर घराच्या किमतीएवढा विमा काढावा लागतो. हा सर्वसाधारण विम्याचा एक प्रकार आहे आणि या विमा पॉलिसीवर बँकेचा बोजा असतो. कर्जाची परतफेड झाल्यावर हा बोजा काढून घ्यावा. अनेक कर्जदार कर्ज फिटल्यावर ही विमा पॉलिसी पुढे चालू ठेवत नाहीत, पण तसे करणे योग्य नव्हे. हा विमा म्हणजे आपल्या घरासाठी एक चांगले सुरक्षा कवच आहे.
कुटुंबीयांना माहिती द्यावी : आपण घेतलेल्या कर्जाबद्दल संपूर्ण माहिती कुटुंबीयांना द्यावी. दुर्दैवाने काही दु:खद घटना घडल्यास ही माहिती उपयोगी पडू शकते.
हमीदाराचे आभार : या कर्जासाठी कोणी हमी दिली असेल, तर कर्ज फिटल्यानंतर त्या हमीदाराला एक आभारदर्शक पत्र पाठवायला विसरू नये. कर्जासंबंधीच्या या छोटेखानी लेखमालेचा शेवट करताना हमीदार किंवा जामीनदाराबद्दलही थोडे सांगायला हवे. कर्जदाराच्या पत गुणांकनासोबत त्याची इतर माहितीही बँक घेते. आवश्यकता वाटल्यास बँक जामीनदाराची मागणी करते. जर मूळ कर्जदार कर्ज फेडू शकला नाही, तर उर्वरित कर्ज जामीनदाराकडून वसूल केले जाते. याबद्दल रिझर्व्ह जरी काही निर्देश देत असली, तरी याचा मूळ गाभा म्हणजे इंडियन काॅन्ट्रॅक्ट अॅक्ट, १८७२ होय. जर एखाद्या कर्जासाठी जामीन / हमी द्यायची असेल, तर तो एक करारनामा आहे आणि त्याबद्दलच्या स्पष्ट अटी या करारनाम्यात दिलेल्या असतात. त्यामुळे जामीन राहताना पुढील काळजी घ्यावी. कर्जदार चांगला माहितीतला असावा. त्याच्या आर्थिक परिस्थितीची पूर्ण कल्पना असावी. तो किती कर्ज घेत आहे, कोणाकडून, कशासाठी घेत आहे, ते फेडण्याची त्याची क्षमता, त्याचे पत गुणांकन, याची माहिती घ्यावी आणि त्याने बँकेशी केलेल्या कराराची एक प्रत आपल्याकडे ठेवून घ्यावी. कर्जदाराने कर्ज थकविल्यास आपली जबाबदारी कोणती ते बँकेशी करार करण्याआधी समजून घ्यावे. (अनेकदा जामीनदार हे नीट समजून घेत नाहीत आणि बँकेकडून नोटीस आली की बँकेला दोष देतात.) बँकेने कर्ज दिल्यानंतर पाच-सहा महिन्यांतून एकदा बँकेत जाऊन कर्जदार कर्जाची परतफेड व्यवस्थित करत आहे ना, ते पाहावे. काही गडबड वाटल्यास कर्जदाराशी स्पष्टपणे बोलावे. जर कर्जदार परतफेड करत नसेल तर ती रक्कम जामीनदाराकडून वसूल करायचा हक्क बँकेला असतो, त्यात काहीही बेकायदेशीर नाही. अशा प्रकारे वसुली केली गेली, तर ती रक्कम मूळ कर्जदाराकडून वसूल करायचा अधिकार जामीनदारास आहे. जामीन राहणे हा काही गुन्हा नाही किंवा यात बेकायदेशीरही काही नाही; परंतु वरील सर्व गोष्टी लक्षात घेऊन केवळ भीड बाळगून किंवा मित्र-मैत्रीण आहे, नातेवाईक आहे, कोणीतरी भरीला घालतंय म्हणून जामीनदार राहू नका.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…