समर्थ राऊळ महाराज
प. पू. श्री राऊळ महाराज कुडाळमध्ये येऊन जाऊन असायचे. कुडाळमध्ये गेल्यानंतर ते अगदी विक्षिप्तपणे वागायचे. त्यामुळे त्यांना सर्वजण ‘खुळे बुवा’ म्हणत! कुडाळमध्ये रामभाऊ नावाचे एक गृहस्थ होते. त्यांच्याकडे बाबा जायचे. पवार एखाद्या आज्ञाधारक मुलाप्रमाणे महाराजांचा प्रत्येक शब्द मानून ते सांगतील त्याप्रमाणे वागायचे. त्यानंतर ते गुरुनाथ पडते यांच्या घरी पण जायचे. त्यांचे कुटुंबीय बाबांचे परमभक्त आहेत. मनोहर बांदेकर नावाचे एक दुकानदार पण बाबांच्या भक्तांपैकीच एक होते. महाराजांबरोबर कितीही माणसे असोत सर्वांना लाडू, चहा द्यायला बाबा त्या दुकानदाराला मनोहर बांदेकरला सांगायचे आणि बांदेकर काहीही मनात किल्मिष न आणता बाबांच्या सांगण्याप्रमाणे करी. महाराजांबरोबर ते खूप ठिकाणी फिरले आहेत. बांदेकर यांच्याकडे राजू नावाचा एक गृहस्थ होता. तो सुद्धा महाराजांची यशाशक्ती भक्ती करायचा.
बाबांच्या सहवासात राहून व बाबांच्या कृपाशीर्वादामुळे राजूने कुडाळमध्ये लॉजिंग बोर्डिंग चालू केले. म्हणजेच महाराजांच्या कृपाशीर्वादामुळेच त्याचे भाग्य बदलले.
प. पू. महाराज कुठेही जायचे असले की ते कुणाचेही काहीच ऐकत नसत. स्वत: सर्वांना तयार करीत व आपण गाडी घेऊन प्रवासाला निघत. कधी कधी महाराज रमाकांत ऊर्फ भाई डिंगे, विनू हवालदार इ. मंडळींना बरोबर घेऊन तडका राजापूर, बुद्रुक, पागोरेपर्यंत प. पू. समर्थ कृष्णाजी सखाराम टेंबे ऊर्फ भाऊ टेंबे यांच्या भेटीला जायचे. एकदा महाराज गाडीत बसून प्रवास करीत होते. घनदाट जंगलातून गाडी निघाली होती. एवढ्यात एक वाघ गाडीसमोर येऊन उभा राहिला. वाघाला पाहिल्याबरोबर गाडीत असलेल्या सर्वांची भीतीने गाळण उडाली; परंतु महाराज शांतच होते. ते अचानक खाली उतरले व वाघाजवळ गेले. वाघ बाबांकडेच रोखून पाहत होता. महाराज वाघाकडे गेले व म्हणाले, ‘चल जा आता’ आणि वाघ त्यांच्या आज्ञेप्रमाणे उडी मारून जंगलात कुठेतरी निघून गेला.
त्याचप्रमाणे कुडाळमध्ये सन १९६३ सालच्या दरम्यान रामकृष्ण नारायण कुडाळकर यांच्याकडे मुक्कामाला जायचे व तेथेच रात्रीच्या वेळी भजन करीत बसायचे. रामकृष्णाचे भाऊ गणेश कुडाळकर हे मुंबईला कालिना! सांताक्रूझ येथे राहात असत. तेथे त्यांच्या घरी महाराज कधी तरी जाऊन राहात. सन १९६३ ते १९६८ या काळात महाराजांचे कुडाळकर बंधूंच्या घरी जाणे-येणे सदोचित चालूच होते. अशाप्रकारे मधू पडते, वर्दम घराणे, भाऊ धाडाम, पारकर कुटुंबीय असे अनेक भक्त कुडाळला होते. त्यांच्याकडे महाराज मुक्कामाला राहात असत.
मधू पडते यांच्या गाडीतूनही बाबांनी खूपच प्रवास केलेला आहे. डॉ. बांदेकर हे बाबांचे परमभक्त होते. ते मुंबईला राहात असत. बाबा मुंबईला गेले की, त्यांच्याकडे राहायला जात असत. त्याशिवाय दत्ता बांदेकर, गणपत वालावलकर, कल्याण पाटील, कुडाळचे प्रसिद्ध वकील डी. डी. देसाई व दादा भोसले इत्यादी बाबांचे प्रिय भक्त होते. त्यांच्याकडे महाराजांचे येणे-जाणे, खाणे, पिणे, भजन करणे चालू असायचे. तसेच मोहन मठकर हे बाबांचे पहिलेच गाडीवाले भक्त त्यांनी. पण बाबांची फारच सेवा केली आहे.