मुंबई : अंधेरीच्या विधानसभा पोटनिवडणुकीत आज महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटाच्या युतीच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. अंधेरीची पोटनिवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आणि शिंदे गट- भाजपसाठी लिटमस टेस्ट आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक असून मतदार कोणाला कौल देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीत मुरजी पटेल यांच्यासोबत भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि आरपीआय (आठवले गट)चे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्तेही सहभागी होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर, खासदार मनोज कोटक, भाजप नेते प्रवीण दरेकर, आमदार नितेश राणे, अमित साटम, मुंबई भाजप उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी सहभागी झाले. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या ऋतुजा लटके यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप आदी नेते उपस्थित होते.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा धुरळा जरी उडाला असला तरी भाजप आणि ठाकरे गटाने सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येते. ठाकरे गटाकडून संदीप नाईक यांचाही निवडणूक अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर भाजपनेही मुरजी पटेलांचे दोन अर्ज दाखल केले आहेत.
दरम्यान, मूळ शिवसेना ही आमच्या बाजूने असून मुरजी पटेल हे बहुमताने विजयी होतील असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री दिपक केसरकर यांनी केला आहे.
अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना पटेल म्हणाले की, अंधेरीच्या जनतेचा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे. तसेच मी केलेल्या जनसेवा कार्यावरही माझा विश्वास आहे. अंधेरीच्या लोकांसाठी काम करणे हे माझे नेहमीच प्राधान्य राहिले आहे आणि पुढेही राहील. अंधेरीच्या या पोटनिवडणुकीत ३ नोव्हेंबरला मतदान होणार असून, ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.