ठाणे (प्रतिनिधी) : एसटीच्या ठाणे विभागाने यंदा प्रवाशांसाठी खास दिवाळी भेट दिली आहे. महामंडळाच्या ठाणे विभागातर्फे दिवाळीकरिता जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. येत्या १५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत ठाणे एसटीच्या विविध आगारांमधून प्रतिदिन ३०जास्त बसेस धावणार आहेत. या गाड्यांसाठीची आरक्षण प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती ठाणे एसटी विभागाकडून देण्यात आली आहे.
गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या नागरिकांची तर नवरात्रीदरम्यान कोल्हापूर, सोलापूर तसेच नाशिक या ठिकाणी देवदर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. या नागरिकांच्या सोयीसाठी राज्य एसटी विभागाकडून दरवर्षी अधिकच्या बसेस सोडण्यात येतात. यावर्षीदेखील गणेशोत्सवादरम्यान ठाणे एसटी विभागाकडून कोकणात जाण्यासाठी अधिकच्या गाड्या सोडण्यात आल्या होत्या. या अधिकच्या वाहतुकीतून ठाणे एसटी विभागाला दोन कोटी रुपयांहून अधिकचे उत्पन्न मिळाले होते.
नवरात्रीनंतर येणाऱ्या दिवाळी उत्सवात मुंबई, ठाणे आणि उपनगरांतून अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, पुणे, उस्मानाबाद, कोल्हापूर, पाचोरा, कराड, शिरूर, जळगाव या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असते. या पार्श्वभूमीवर ठाणे एसटी विभागातर्फे सर्व भागांमध्ये जाण्यासाठी अधिकच्या गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील विविध बस आगारांतून या भागांमध्ये दररोज अधिकची वाहतूक करण्यात येणार आहे. १५ ते ३० ऑक्टोबरदरम्यान ही वाहतूक होणार आहे.