Sunday, March 23, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरवसई-विरारकरांचे सायबर लुटीतील ५९ लाख परत

वसई-विरारकरांचे सायबर लुटीतील ५९ लाख परत

९ महिन्यांतील सायबर शाखेची कारवाई

विरार (प्रतिनिधी) : सायबर गुन्हे शाखेने मागील ९ महिन्यांत विविध गुन्ह्यांतून लुटली गेलेली ५९ लाखांची रक्कम परत मिळवली आहे. सध्या स्मार्टफोनमुळे ऑनलाइन व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे नागरिकांची फसवणूक करणारे सायबर भामटेदेखील सक्रिय झालेले आहेत. ते विविध प्रकारे नागरिकांची फसवणूक करत असतात. विविध प्रकारचे आमिष दाखवून, योजनांमध्ये गुंतवून नागरिकांच्या खात्यातील रक्कम लंपास करण्यात येत आहे. मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर गुन्हे शाखेने याप्रकरणी त्वरित कारवाई करून तक्रारदार नागरिकांच्या पैसे परत मिळवून देत असते. चालू वर्षांतील १ जानेवारी ते ३० सप्टेंबर या ९ महिन्यांत सायबर गुन्हे शाखेने तब्बल ५९ लाख रुपयांची रक्कम परत मिळवून दिली आहे.

सायबर भामटे नागरिकांची फसवणूक करताना ४ मार्गानी त्यांचे पैसे खात्यातून लंपास करतात. त्यातील पहिला म्हणजे ई कॉमर्स संकेतस्थळांवर पैसे वळवले जातात. डमी ऑर्डरने ते कंपनीकडे व्यवहार करतात आणि फसवणूक झालेल्या नागरिकांचे पैसे येताच ते काढून घेतात. यामुळे ते कधी पकडले जात नाहीत. दुसऱ्या प्रकारात पेमेंट गेटवेच्या माध्यमातून (उदा. गूगल पे, फोन पे, पेटीएम) पैसे वळवले जातात. तिसऱ्या प्रकारात मनोरंजन, खेळ (गेमिंग) च्या संकेतस्थळावरून पैसे वळविण्यात येतात. तर चौथ्या प्रकारात थेट बँकेतून काढून यूपीआयद्वारे दुसऱ्या बँक खात्यात वळवले जातात.

याबाबत माहिती देताना सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुजीत गुंजकर म्हणाले, जेव्हा वाणिज्य संकेतस्थळ, पेमेंट गेटवे आणि गेमिंग संकेतस्थळावर नागरिकांची फसवणूक करून पैसे वळवले जातात तेव्हा आम्ही तात्काळ संबंधित कंपनीला संपर्क करून व्यवहार थांबवतो आणि ते पैसे नागरिकांना परत मिळवून देत असतो. मात्र जेव्हा पैसे दुसऱ्या खात्यात जातात तेव्हा मात्र कायदेशीर प्रक्रिया करावी लागते. त्याला विलंब लागतो.

ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाली, की नागरिक स्थानिक पोलीस ठाण्याकडे तक्रार करतात. मात्र स्थानिक पोलीस या तक्रारी घेत नाहीत किंवा सायबर कक्षाकडे जाण्याचा सल्ला देतात. पोलीस आयुक्तालयाच्या सायबर कार्यालयाबद्दल नागरिकांना फारशी माहिती नसते. शिवाय ते लांबही आहे. त्यामुळे फसवणुकीनंतर २४ तासांचा कालावधी निघून जातो आणि लुटीचे पैसे परत मिळविण्यात अडचणी येतात.

नागरिकाची कोणती दक्षता घ्यावी…

  • ऑनलाइन कर्जाचे अॅप (लोन अॅप) डाऊनलोड करण्यापूर्वी त्याच्या सत्यतेची पडताळणी करावी. कोणताही अनोळखा कॉल आल्यास क्रेडिट कार्ड आणि बँकेशी संबंधित माहिती देऊ नये. तसेच ओटीपी शेअर करू नये. क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करताना त्याची माहिती कोठेही सेव्ह करू नये.
  • क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांने व्यवहाराचे (ट्रान्झॅक्शनचे) प्रत्येक लघुसंदेश (एसएमएस) तपासावे. त्यामध्ये काही अनियमितता असल्यास तात्काळ संबंधित बँकेस व सायबर कक्षाकडे तक्रार करावी. सध्या ५ जी सेवा नव्याने सुरू करण्यात आलेली आहे. त्यासंबंधित फसवे कॉल, एसएमएस, लिंक प्राप्त झाल्यास त्याला प्रतिसाद देऊ नये.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -