Monday, February 17, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरवसई-विरारमधील रस्त्यांवर दरवर्षी ५० कोटींचा खर्च!

वसई-विरारमधील रस्त्यांवर दरवर्षी ५० कोटींचा खर्च!

भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटीत आयुक्तांची माहिती, शहरातील विविध समस्या सोडवण्याची भाजपची मागणी

विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार शहरातील रस्त्यांची दुर्दशा लक्षात घेता मुख्य रस्ते सिमेंट काँक्रिटचे बनवण्यात यावे, अशी मागणी वसई भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. यावर रस्त्यांवर दरवर्षी ५० कोटींचा खर्च करण्यात येत असल्याची माहिती आयुक्तांनी भाजप कार्यकर्त्यांना दिली. रस्ते, पाणी, उड्डाणपूल व अन्य विषयांच्या अनुषंगाने भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी आयुक्त अनिलकुमार पवार यांची भेट घेतली. या भेटीत विविध समस्या सोडवण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली.

खोलसापाडा धरण हा प्रकल्प वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रालगत असल्याने प्रकल्पाचे शंभर टक्के पाणी वसई-विरार शहरासाठी आरक्षित केल्यास या भागातील प्रश्न कायमचा सुटणार आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी एकूण अंदाजे ११० कोटींच्या निधीची आवश्यकता आहे; त्याकरता उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निधी उपलब्ध करून घ्यावा.

शिवाय सरकार विक्रमगड तालुक्यात १५०० कोटी रुपयांचा नवीन देहरजी धरण प्रकल्प राबवत आहे, त्यातील ५० टक्के पाणी वसई-विरार महानगरपालिकेकरता मागून घ्यावे, याशिवाय शहरातील महत्त्वाच्या नाक्यांचे सुशोभीकरण करणे, पीडब्लूडीच्या ताब्यातील रस्ते देखभालीकरता महापालिकेच्या ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी या भेटीत करण्यात आली. सोबतच मोदी सरकारने वसई-विरार महानगरपालिकाच्या विकास कामाकरता मंजूर केलेले १२०० कोटी रुपये, पुराचे व पावसाचे पाणी धरून ठेवणाऱ्या धारण तलावांची सद्यस्थिती, रस्त्यावरील भंगार वाहने उचलणे, महानगरपालिकेच्या वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट याविषयीदेखील सकारात्मक चर्चा या बैठकीत करण्यात आली.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून वसई ते पालघर (दातीवरे) नारंगी गावाजवळ वैतरणा खाडीवर ४.५६ किमी लांबीचा ६४५ कोटी रुपये खर्चाचा दूपदरी पूल प्रस्तावित आहे. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक समस्या कमी होणार आहे, त्याबाबतही भाजप कार्यकर्त्यांकडून माहिती घेण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या या भेटीप्रसंगी भाजपचे वसई-विरार जिल्हा सचिव हरिष भगत, विरार शहरध्यक्ष नारायण मांजरेकर, महेश पटेल, महेश कदम, अरविंद गावडे, नर व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -