अशी नाटकं आता महाराष्ट्रात चालणार नाहीत, आता काही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीत!
भाजपा आमदार नितेश राणेंची खोचक टीका!
अमरावती : अमरावती आणि धुळ्यामध्ये “सर तन से जुदा” अशा घोषणा दिल्या गेल्या होत्या. त्याची चौकशी आता महाराष्ट्र सरकार करणार आहे!! असंख्य हिंदूंच्या हृदयावर राज्य करणारे आमचे देवेंद्र फडणवीसजी यांचे मनापासून आभार..!! असे ट्वीट भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
एकीकडे शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगत असताना दुसरीकडे भाजपा विरुद्ध ठाकरे गट असा वादही सुरू आहे. दोन्ही बाजूच्या नेतेमंडळींकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही. या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये भाजपा खासदार अनिल बोंडे यांच्या मुलाच्या लग्नासाठी आलेले आमदार नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरे संपलेला माणूस आहे’, असे नितेश राणे म्हणाले. याशिवाय, अमरावती आणि धुळ्यात झालेल्या नारेबाजीवरूनही नितेश राणेंनी टीकास्र सोडले.
अमरावती आणि धुळ्यामध्ये "सर तन से जुदा" अशा घोषणा दिल्या गेल्या होत्या. त्याची चौकशी आता महाराष्ट्र सरकार करणार आहे!!
असंख्य हिंदूंच्या हृदयावर राज्य करणारे आमचे @Dev_Fadnavis जी यांचे मनापासून आभार..!!
— nitesh rane (@NiteshNRane) October 13, 2022
नारेबाजीविषयी प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता नितेश राणेंनी त्यावर टीकास्र सोडले. “अशा पद्धतीची घोषणा आणि अशी नाटकं आमच्या महाराष्ट्रात चालणार नाहीत. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. तुम्हाला तुमचे सण साजरे करायचे असतील, तर शांततेत करा. हिंदुंना कोणतंही आव्हान द्यायचा प्रयत्न करायचा नाही. आता महाविकास आघाडीचं सरकार नाही. नवाब मलिक अल्पसंख्याक मंत्री नाहीत, अस्लम शेखही मंत्री नाही आणि त्यातही प्रामुख्याने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीत. ही सगळी नाटकं जे कुणी करत असतील, त्यांना पोलीस शोधून काढतील आणि पुन्हा अशा घोषणा होणार नाहीत याची काळजी आमचं सरकार घेईल”, असे नितेश राणे म्हणाले.
दरम्यान, अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीवरून सध्या राजकीय वातावरण तापलेलं असताना त्यावरून नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केली आहे. ऋतुजा लटकेंचा राजीनामा मुंबई महानगर पालिकेकडून स्वीकारला जात नसल्यामुळे या निवडणुकीसाठी दुसरा उमेदवार देण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी केल्याबाबत विचारणा केली असता नितेश राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे काय करतात, याची मला चिंता नाही. उद्धव ठाकरे संपलेला माणूस आहे. त्यावर जास्त कशाला बोलायचं?” असा खोचक सवाल नितेश राणेंनी केला.
अमरावती मधील धर्मांधांकडून दिल्या गेलेल्या ‘सर तन से जुदा’ घोषणा प्रकरणाच्या चौकशीचे आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या घटनेची दखल घेऊन तिच्या चौकशीचे आदेश देण्याच्या देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेचे सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे. अशा प्रकारे राज्याचा धार्मिक आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या हेतून केल्या गेलेल्या धर्मांधांच्या कृत्यांना पायबंद बसलाच पाहिजे असाच संदेश यातून फडणवीसांनी दिला आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे ९ ऑक्टोबरला ईद-ए-मिलाद निमित्त निघालेल्या मिरवणुकीत धर्मांधांनी सर तन से जुदाच्या घोषणा दिल्या होत्या. त्याचा व्हिडिओही समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता.
धर्मांधांच्या या कृत्याची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश देणाऱ्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजप आमदार नितेश राणे यांनी आभार मानले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात यांसारख्या घटनांची दखलही घेतली जात नव्हती. त्यांच्या काळात घडलेल्या अमरावतीतील उमेश कोल्हे प्रकरणातील चौकशी दरम्यान पोलिसांकडून दिरंगाईच दाखवली गेली होती. पण आता सरकार बदलले आहे आणि अशा कृत्यांची गय केली जाणार नाही असा संदेश देणाऱ्या फडणवीसांचे आभार नितेश राणेंनी मानले आहेत.