Wednesday, January 15, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यकष्टाने कमावले, पावसाने गमावले...!

कष्टाने कमावले, पावसाने गमावले…!

संतोष वायंगणकर

महाराष्ट्रातील विविध भागांत पाऊस बरसत आहे. हवामान खात्याचे अंदाजही अलीकडे अचूक ठरत आहेत. हवामान विभाग पावसाची नेमकी स्थिती कशी असेल यासंबंधी जाहीर करते. त्याप्रमाणे त्या-त्या भागात पाऊस हजेरी लावतोय. कोकणात तर पूर्वी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांपर्यंतच पाऊस असायचा. तो देखील सप्टेंबर अखेरीस परतीचा पाऊस यायचा. मात्र गेल्या काही वर्षांत ऋतुचक्र बदलले आहे. ‘ऑक्टोबर हीट’ असायची. पूर्ण महिना उष्णतेने आपण हैराण असायचो. आता मात्र हे सारचं बदललं आहे. यावर्षी तर जानेवारीपर्यंत पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे भातशेतीचे तर नुकसान झालेच आहे. मधल्या काही वर्षांत कोकणात भातशेती शेतकऱ्यांनी सोडली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांत भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. पूर्वी स्वत:च्या कुटुंबाला वर्षभर पुरतील, या हिशोबाने भाताची लावणी व्हायची. आता वर्षभर कुटुंबाला पुरून भाताची विक्री करता आली पाहिजे, असा त्यामागचा उद्देश असतो. म्हणूनच कोट्यवधी रुपये कोकणातील शेतकऱ्याच्या घरी येत आहेत. पारंपरिक भात लावणी कमी झाली. नवनवीन आधुनिक बियाण्यांची लावणी करून दामदुप्पट भाताचे उत्पादन कसे घेता येईल, याचा अभ्यासही कोकणातील शेतकरी करू लागला आहे. त्याच धर्तीवर तो शेती करतोय.

पूर्वीचे कोकणातील शेतीचे आणि शेतकऱ्याचे परिमाण आता बदलले आहेत. मात्र, अल्प संतुष्टता, समाधानी कायम आहे. यावर्षीही सध्या होत असलेल्या पावसाने भातशेतीचे प्रचंड मोठे नुकसान होत आहे. ज्यांची हळव्या भातांची लागवड होती, त्यांचेही नुकसान झाले. भात तयार होण्यापूर्वीच पावसाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर मारा झाला. दाणा तयार होण्याच्या कालावधीतच पाऊस मोठ्या प्रमाणावर आल्याने भात तयारच होऊ शकले नाही. मात्र, कोकणातील शेतकरी कितीही नुकसान झाले तरीही कधीच नुकसान झाले म्हणून सांगायला कधी पुढे येत नाही. नुकसान झाले त्याचे मार्केटिंग कोकणातील शेतकऱ्याला कधीच जमत नाही. तो झालेले नुकसान सोसत, सहन करत पुन्हा नव्याने लागवड कशी करता येईल याचा विचार करताना दिसतो. गेल्या तीन वर्षांत कलिंगड पिकाचे नुकसान झाले. गवारेडा, रानडुक्कर, फळमाशी यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही कलिंगड लागवड करणारा शेतकरी प्रयत्न करत राहतो. भाजीच्या लागवडीचं गणित चुकले तरीही नफा कमी मिळाला तरीही चालेल; परंतु शेती सोडायची नाही. शेतीत बसून रडायचं नाही. अशा मानसिकतेत कोकणातील शेतकरी पूर्वी आणि आजही आहे. भातशेती शेतात उभी दिसते; परंतु सतत पडणाऱ्या पावसाने शेतात पिकणाऱ्या भातशेतीतून प्रत्यक्षात हाती काय लागेल? कितपत भात मिळले अशा चिंतेत
शेतकरी आहे.

ऋतुचक्राच्या या बदलाचा परिणाम जसा भातशेतीच्या बाबतीत असणार आहे. तसा तो फळबागायतींच्या बाबतीतही होऊ शकतो. अशी भीती फळबागायतदार शेतकरी आजच व्यक्त करू लागला आहे. गतवर्षी फळमाशीने आंबा, काजू, कोकम, कलिंगड या बागांचे मोठे नुकसान फळमाशीने केले आहे. यावर्षी फळमाशीच्या प्रादुर्भावाची चिंता बागायतदार शेतकऱ्यांना आहेच! कोकणातील शेतकरी चिंताग्रस्त असला तरीही त्याच्या चेहऱ्यावर चिंता कुठे दिसत नाही. याचे कारण तो समाधानी असतो. शासनाकडून काही मदत मिळावी म्हणून तो कधीच प्रयत्नशील नसतो. त्याची ती अपेक्षाही नसते. यामुळेच शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे म्हणून कधीच कोणी शेतकरी आंदोलन, मोर्चा कोकणात काढताना दिसत नाहीत. यात मुळातच इतक्या वर्षांनंतरही कोकणातील शेतकरी संघटित नाहीत. शेतीच्या समस्या, प्रश्न, शेतीतील नव-नवीन विचार, तंत्रज्ञान यातल्या कुठल्याच बाबतीत कोकणातील शेतकरी एकत्र आले, चर्चा केली. त्यावरच्या उपाययोजनांवर शेतकऱ्यांनी चर्चा केली असं कधीच घडलेले नाही. शासनाने दखल घेतली तर ठीक. शासनाने काही विचारणाच केली नाही. तरीही ठीक हे या पद्धतीने सगळं सुरू राहते. भातशेतीच्या बाबतीत जेव्हा भातकापणी होईल तेव्हा प्रत्यक्ष घरात किती भात येतं यावरच नुकसान किती झाले हे समजू शकेल. पडणाऱ्या पावसामुळे शेती, बागायतींचे नुकसानच होत आहे. ज्या भागात पाणी साचते अशा भागातील भातशेती तर काही ठिकाणी कुजली आहे. पण तरीही कोकणातील आपला शेतकरी मस्त चहा-भजींचा आस्वाद घेत जगाच्या राजकारणाच्या गजालीत रमलेला असतो. त्याचा आनंद आणि समाधान इथल्या शेतकऱ्यांने स्वत:च जपलंय.

गुरांना लम्पी रोगाची लागण कोकणात वर्ष-दीड वर्षांपूर्वीच लागली आहे. तशी लक्षणे असलेल्या अनेक गुरांना ग्रामीण उपचार करून काहींनी वाचविले. काहींनी आपल्या स्तरावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत गुरांना लसीकरण करून घेतले; परंतु विदर्भात जेव्हा ही लागण सुरू झाली तेव्हा शासनाने गुरांना विदर्भापुरते लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महाराष्ट्रात लम्पीच्या प्रादुर्भावावर मोफत लसीकरण करण्याचा निर्णय सरकारकडून जाहीर करण्यात आला. कोकणातील शेतकरी हा असा आहे, हे यावरूनही स्पष्ट झालंय. नुकसानभरपाईसाठी तो अडून बसत नाही की, आंदोलनही करत नाही. नवीन लागवड करायला तो पुन्हा नव्या जोमाने उभा राहतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -