Monday, October 20, 2025
Happy Diwali

राज्यात महिला व मुली पळविणारे रॅकेट!

राज्यात महिला व मुली पळविणारे रॅकेट!

सखोल चौकशी करण्याची मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांची मागणी

मुंबई : 'महाराष्ट्रातून महिला गायब होण्याचे प्रमाण वाढतच आहे पण कोणालाही त्याचे काही पडलेले नाही. महिला गायब होण्यामागे कोणते रॅकेट तर नाही ना? याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. गायब झालेल्या महिलांना त्यांच्या घरी पुन्हा सुखरूप पोहचवणे ही सरकारची, पोलिसांची जबाबदारी आहे, हे विसरून चालणार नाही', असे ट्विट करत मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी महिला गायब होण्याच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.

मागील ३९ दिवसांत तब्बल ५८ महिला-तरूणी घराबाहेर गेल्यानंतर त्या परतलेल्याच नाही. ही एक गंभीर बाब आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. महिला व तरूणींना पळविणारे रॅकेट तर नाही ना, अशी शंका यामुळे उपस्थित होत आहे.

घरातून कॉलेजला जाण्यासाठी निघालेल्या १६ वर्षांच्या दोन मुली अचानक गायब झाल्या आहेत. फूस लावून त्यांना कुणीतरी पळविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. औरंगाबादमधील उस्मानपुरा आणि मुकुंदवाडी भागातून या घटना समोर आल्या आहेत. त्यांच्या आई-वडिलांनी पोलिसांत याबाबत तक्रार दिल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत जयभवानी नगर येथील महिलेने आपल्या अकरावीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात केली आहे.

औरंगाबाद शहरातून गेल्या सप्टेंबर महिन्यात एकूण १३४ जण बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस दफ्तरीत आहे. यात ६२ महिला व तरुणींचा समावेश आहे. १८ ते २९ वयोगटातील तब्बल ४३ तरुणी घरातून बाहेर गेल्या व त्या परत आलेल्याच नाहीत, तर २९ तरुण घरातून निघून गेले आहेत.

शहराच्या विविध पोलीस ठाण्यांतून प्राप्त आकडेवारीनुसार, चालू महिन्यात १ ते ८ ऑक्टोबरपर्यंत २१ जण बेपत्ता झाल्याची नोंद आहे. यात १५ महिला-तरुणींचा समावेश आहे. १८ ते २९ वयोगटातील तब्बल ११ तरुणी घराबाहेर गेल्यानंतर परत आलेल्याच नाही. त्या नेमक्या गेल्या तरी कुठे? याचा शोधही अद्याप पोलिसांना लागलेला नाही.

Comments
Add Comment