Monday, February 17, 2025
Homeदेशचीनकडून १३०० भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा मंजुर

चीनकडून १३०० भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा मंजुर

चीनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना महासाथीच्या दोन वर्षानंतर चीनमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चीनने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी १३०० हून अधिक विद्यार्थ्यांना व्हिसा मंजूर केला आहे.

चीनच्या परराष्ट्र खात्याने भारतीय दूतावासाला दिलेल्या माहितीमधून ही बाब समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोना महासाथीची लाट सुरू झाल्यानंतर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून दोन्ही देशातील थेट विमानसेवा बंद करण्यात आली होती. नुकतेच, ३०० भारतीय व्यावसायिक चीनमधील फॅक्टरी हब असलेल्या यिवूमध्ये दोन चार्टर विमानाने दाखल झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे आशियाई विभागाचे संचालक लिऊ जिन्साँग यांनी भारतीय राजदूत प्रदीप रावत यांची मंगळवारी भेट घेतली. या वेळी भारत-चीनमधील द्विपक्षीय संबंध, क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती आदी विविध मुद्यांबाबत चर्चा झाली.

कोरोना महासाथीनंतर चीनने ऑगस्ट महिन्यात कोरोना निर्बंध शिथील केले. चीनमध्ये शिक्षण घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पुन्हा चीनमध्ये येण्यास परवानगी देण्यात आली. आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या आयसोलेशनच्या कालावधीत ही कपात करण्यात आली. आता सात दिवस हॉटेलमधील आयसोलेशन आणि घरी तीन दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. जूनमध्ये हा कालावधी १४ आणि सात दिवसांचा होता. चीनच्या सांस्कृतिक आणि पर्यटन खात्याने मागील महिन्यात परदेशी नागरिकांसाठीचे निर्बंध शिथिल करण्यासाठीच्या नियमांचा मसुदा जारी केला आहे. चीनमधील कोरोना निर्बंधामुळे चिनी विद्यापीठांमध्ये नोंदणी केलेले २३ हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी मायदेशीच अडकले होते.

चीनमध्ये अद्यापही थेट उड्डाणे सुरू झाले नाहीत. चीनमध्ये दाखल झालेले भारतीय विद्यार्थी हे हाँगकाँग मार्गे दाखल झाले आहेत. हाँगकाँग मार्गे दाखल होणाऱ्यांसाठी तीन दिवसांचे सेल्फ मॉनिटरिंग आवश्यक आहे. तर, क्वारंटाइन सक्तीचे नाही. मात्र, अद्यापही विमान प्रवासाचे तिकीट दर अधिक आहेत. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनानंतर कोरोना निर्बंध शिथिल होतील, अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र, निर्बंध शिथिल झाले नाहीत. मात्र, चीनमधील काही भागांमध्ये कोरोनाचा ओमायक्रॉनचा सबव्हेरिएंट बीए५.१.७ आढळल्याने निर्बंध पूर्णपणे शिथिल होणार नसल्याचे म्हटले जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -