मुरूड (प्रतिनिधी) : रायगडसह राज्याला ऑक्टोबर महिन्यातही झोडपून काढलेल्या पावसाने रविवारी सुट्टी घेतली. तरी १४ ऑक्टोबरपर्यंत राज्यात ठीकठिकाणी पावसाची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने मुरुड मध्ये सर्वाधिक १६१ मि.मि.पाऊसपडून उच्चांक गाठला होता. आता बहुतांशी जिल्ह्यात विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या इशाऱ्यानंतर बहुतांश मासेमारी नौका परतू लागल्या आहेत. उभी पिके आडवी झाल्याने शेतकरी बांधवांचे नुकसान झाले असून शासनाच्या संबंधित खात्याकडून पंचनामे करण्याची मागणी जोर धरत आहे.
परतीचा पाऊस अद्यापही राज्यात दाखल झालेला नाही. तो गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह उत्तरेकडील राज्यात आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस महाराष्ट्रात दाखल होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात त्याला लेट मार्क लागला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद सह विदर्भातील जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वारंवार होणाऱ्या हवामानातील बदलांमुळे मासेमारी व्यवसाय ठप्प होऊ लागला आहे. त्यामुळे मच्छिमार आर्थिक संकटात सापडले आहेत. समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या नौका परतु लागल्या आहेत. शेतातील उभे पीक या पावसामुळे बहुतांश ठिकाणी आडवी होवुन नुकसान झाले असल्याने शेतकरी बांधवांच्या चिंतेत भर पडली असून शासनाच्या संबंधित खात्याकडून नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी जोर धरत आहे.