डॉ. सुकृत खांडेकर
पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले की काय होते, ते काँग्रेस पक्षाने अनुभवले आणि शिवसेनेलाही तसेच परिणाम भोगावे लागत आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आता नुसते शिवसेना असे म्हणता येणार नाही, त्यामुळे उद्धव गटाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे हायकमांड भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत संघटना बांधणीसाठी पदयात्रेत गुंतले आहेत. पण उद्धव यांच्या पक्षाचे नेतृत्व स्पर्धक शिंदे गटाला गद्दार, डुक्कर, बांडगूळ, मिंधे आणि खोका अशी हेटाळणी करण्यातच समाधान मानत आहेत. काँग्रेस पक्षाचे लोकसभेत एकेकाळी चारशे खासदार होते, त्या पक्षाला आता पन्नाशी गाठताना दमछाक होत आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राच्या विधानसभेने दीडशेपेक्षा जास्त आमदार बघितले आहेत, त्या पक्षाचे आता चाळीस-बेचाळीस आमदार आहेत. शिवसेनेचे १९९५ मध्ये सर्वाधिक ७३ आमदार निवडून आले होते. नंतर २०१४ ला ६३ आमदार होते, त्याचेही कौतुक झाले. २०१९ मध्ये ५६ आमदार निवडून आले. त्यापैकी ४० आमदार शिंदे गटात गेले. लोकसभेत शिवसेनेच्या अठरा खासदारांपैकी बारा आमदारांनी शिंदे गटाची झूल अंगावर घेतली.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाआघाडी सरकारमध्ये शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्रीपद मिळाले, नातवाला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. पण अडीच वर्षे त्या सरकारचे आयुष्य राहिले. शिवसेना दुभंगली, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सेनेत उठाव झाला. आता निवडणूक आयोगाने तात्पुरते का होईना धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवले आणि नुसते शिवसेना हे नाव लावायलाही मनाई केली. उद्धव यांच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’, तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव दिले आहे. महाआघाडीने दिलेली सत्ता, शिवसेनाप्रमुखांनी ५६ वर्षांपूर्वी एका ध्येयाने स्थापन केलेल्या शिवसेनेच्या मुळावर आली. आजही उद्धव यांना सोनिया गांधी आणि शरद पवार यांची साथ मोलाची वाटत आहे. गेली पंचवीस वर्षे भाजपबरोबर युतीत सडलो, अशी भूमिका उद्धव यांनी मांडून भाजपकडे जाण्याचे दोर त्यांनी स्वतःच कापून टाकले आहेत.
दसरा मेळावा ही शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेची मक्तेदारी होती. पंचावन्न वर्षांचा त्याला इतिहास आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे या वर्षीही उद्धव गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर झाला. पण त्याच दिवशी, त्याच वेळी एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील बीकेसीवर (बांद्रा-कुर्ला काॅप्लेक्स) दसरा मेळावा घेऊन विराट शक्तिप्रदर्शन केले. सर्वात मोठा मेळावा कोणता, या प्रश्नाची चर्चाही मोठी झाली. शिवाजी पार्कपेक्षा बीकेसीवर गर्दी दुपटीपेक्षा जास्त होती, हे एकनाथ शिंदे यांच्या विरोधकांनाही मान्य करावे लागेल. इतकी वर्षे शिवसेनेचे सभा, मेळावे व इव्हेंट साजरे करण्यात एकनाथ शिंदे व त्यांची टीम राबत होती. आता त्यांच्याच सभा व मेळावे त्यांचीच टीम जोरदार उत्साहाने साजरे करीत आहे. मग ते देखणे होणारच. इतकी वर्षे शिवसेनेचे भव्य व्यासपीठ उभारणारे, राबणारे हात आता शिंदे गटाकडे आहेत. एकनाथ हे मोठा जनाधार असलेले नेतृत्व आहे आणि त्यांच्याबरोबर सरकारमध्ये कुशाग्र बुद्धिमत्ता आणि कुशल रणनीती आखणारे देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील चाणक्य आहेत. शिंदे-फडणवीस एकत्र आहेत व त्यांच्या पाठीशी मोदी-शहांचा भक्कम आशीर्वाद आहे. यापेक्षा राज्यात दुसरी कोणती मोठी शक्ती असू शकते? म्हणूनच शक्तिप्रदर्शनामध्ये एकनाथ शिंदे हे उद्धव गटाला भारी ठरले, हे बीकेसीवरील दसरा मेळाव्यातून स्पष्ट झाले.
एकनाथ शिंदे यांचे भाषण सत्त्याऐंशी मिनिटे झाले, फारच लांबड लावली होती. त्यांचे भाषण सुरू झाल्यावर अनेक लोक उठून निघू लागले, त्यांनी भाषण वाचून दाखवले, त्यांचे भाषण म्हणजे भाजपची स्क्रिप्ट होती, मेळाव्यावर दहा कोटी खर्च झाले, हे पैसे आणले कोठून? अशी प्रश्नावली उद्धव गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून डागण्यात आली. सोनिया गांधी पंचवीस वर्षे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्या आजही बारा मिनिटांचे भाषण वाचून दाखवतात, त्याविषयी या कोणी प्रश्न विचारले असे कधी घडले नाही. बीकेसी मेळाव्यासाठी दुपारी १२ वाजल्यापासून लोक तिथे संपूर्ण राज्यातून आले होते, त्याविषयी प्रश्नकर्त्यांना कौतुक नाही. मेळाव्यासाठी पैसे भरून बसेस आणल्या, तर पैसे कोठून आणले असे विचारण्यातच त्यांना धन्यता वाटते. दूरवरून आलेल्या लोकांना भोजन दिले, तर भोजनावळी अशी टिंगल केली. या लक्षावधी लोकांनी पायी चालत यावे व त्यांना उपाशी ठेवावे, अशी महाआघाडी नेत्यांची अपेक्षा होती काय?
एक रिक्षावाला, सामान्य शिवसैनिक, ठाण्यातील टेंभी नाक्यावरचा धर्मवीर आनंद दिघे यांचा शिष्य बीकेसी मैदानावर चार लाखांच्या विराट मेळाव्यात भाषण करतो व त्यांचे भाषण ऐकायला महाराष्ट्रातून, प्रत्येक जिल्ह्यांतून लोक येतात, हेच मोठे कौतुकास्पद आहे. पण आपल्याला महाराष्ट्रात मोठा विरोधक उभा राहतो आहे, ही पोटदुखी उद्धव गटाला असावी. राजकारणात एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप होतच असतात. पण ते करताना मर्यादा ओलांडायची नसते. ‘बाप मंत्री, कार्ट खासदार, कोणाचा आमदार आणि पुन्हा डोळे लावून बसलाय, नातू नगरसेवक… अरे हो, त्याला शाळेत तर जाऊ दे…’ असे बोलून उद्धव यांनी काय साधले… एकनाथ यांचा डॅाक्टर असलेल्या मुलाचा कार्ट म्हणून उल्लेख केलाच. पण त्यांच्या दीड वर्षाच्या नातवाचा राजकीय टीकेसाठी उल्लेख कशासाठी केला. महाआघाडी सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेताना, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसला होतात, तेव्हा काय स्वतःची दाढी तोंडात जात होती का?, असा प्रश्न विचारून उद्धव यांच्या मनात एकनाथ विषयी किती संताप आहे हे दिसून आले. दि. १९ जून १९६६ रोजी स्थापन झालेल्या शिवसेनेकडे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह १९८९ पासून आहे. गेली तेहतीस वर्षे धनुष्यबाण ही शिवसेनेची निवडणुकीतील ओळख आहे. १९६८ मध्ये राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेने नोंदणी केली, त्यानंतर वेगवेगळ्या चिन्हांवर सेनेने निवडणुका लढवल्या. १९८० पर्यंत झाड, रेल्वे इंजिन, ढाल-तलवार अशी चिन्हे घेऊन सेनेने निवडणुका लढवल्या होत्या. १९८४ मध्ये भाजपबरोबर युती करून भाजपच्या कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक शिवसेनेने लढवली. १९८५ विधानसभा निवडणूक मशाल, बॅट-बाॅल, सूर्य अशा चिन्हांवर सेना लढली.
निवडणूक चिन्ह बदलले गेले किवा गोठवले गेले अशी पाळी यापूर्वी अनेक राजकीय पक्षांवर आलेली आहे. भारतीय जनसंघांचे चिन्ह पणती होते. त्यावेळी ‘जोरसे बोलो दीपक दीपक, प्रेमसे बोलो दीपक दीपक’, अशा घोषणा दिल्या जात असत. आणीबाणीनंतर जनता पक्षात अनेक विरोधी पक्ष विलीन झाले, त्यात जनसंघही विलीन झाला. दुहेरी सदस्यत्वावरून जनता पक्षात जनसंघ व समाजवादी यांचे खूप वादविवाद झाले. अखेर जनता पक्षाचे सरकार कोसळले. पूर्वीच्या जनसंघाने अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली १९८० मध्ये भारतीय जनता पार्टी असा नवा पक्ष स्थापन केला. भाजपला कमळ हे चिन्ह मिळाले.
काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्हही अनेकदा बदलले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या निवडणुका काँग्रेसने बैलजोडी या चिन्हावर लढवल्या होत्या. १९६९ काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. मोरारजी देसाई व कामराज यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस (ओ) व इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस (आर) उभी राहिली. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला गाय-वासरू हे चिन्ह मिळाले. तेव्हा ‘गाय-वासरू नका विसरू’ अशी घोषणा लोकप्रिय झाली होती. १९७८ काँग्रेसमध्ये पुन्हा फूट पडली व इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला पंजा हे चिन्ह मिळाले. पंजा चिन्ह घेऊन त्यांनी १९८० मध्ये निवडणूक लढवली आणि आणीबाणीनंतर गमावलेली सत्ता पुन्हा काबीज केली. ‘न जात पर न पात पर, मुहर लगेगी हाथ पर’, अशी तेव्हा घोषणा होती. शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. तेव्हा त्यांच्या पक्षाला घड्याळ चिन्ह मिळाले. त्यापूर्वी पवारांनी काँग्रेसच्या वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवली होती.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उठावानंतर शिवसेनेने राज्याचे मुख्यमंत्रीपद गमावले, महाराष्ट्राची सत्ता गमावली, ४० आमदार व १० समर्थक असे ५० आमदार गमावले. १२ खासदार गमावले आणि शिवसेना हे चार अक्षरी नावही गमावले. एवढेच नव्हे तर शिवसेनाप्रमुखांचा व्यक्तिगत सेवक थापालाही गमावले. शिंदे यांना मिळालेल्या पक्षाच्या नावात ठाकरे हे नाव नाही म्हणून उद्धव गटात आनंद व्यक्त होत आहे. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे एका कुटुंबाच्या मालकीचा पक्ष होतोय, हे त्यांच्या लक्षात आलेले नाही. शिंदे गटाविरोधात प्रचार करताना बाळासाहेबांच्या शिवसेनेला पराभूत करा, असे उद्धव सांगणार काय? असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे.
सीमेवर हालचाली वाढल्या, गावं रिकामी केली; सैन्याच्या सुट्ट्याही रद्द... भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची…
उन्हाळ्याच्या (Summer) हंगामात घट्ट शूजऐवजी सँडल (Sandals) घालणे खरोखरच आरामदायक आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये शरीराला थंड…
लेले, मोने आणि जोशी परिवाराने सांगितला तिथे घडलेला सर्व थरार मुंबई : काश्मीरच्या निसर्गरम्य खोऱ्यात…
नवी दिल्ली : मंगळवार २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे…
दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली: पहलगाममधील पर्यटकांवर…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम…