Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीठाकरे सेनेच्या ‘मशाल’ चिन्हावर समता पार्टीचा दावा!

ठाकरे सेनेच्या ‘मशाल’ चिन्हावर समता पार्टीचा दावा!

निवडणूक आयोगाकडे धाव

अंधेरी पोटनिवडणुकीत समता पार्टीचा उमेदवारही देणार

मुंबई : ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेल्या ‘मशाल’ चिन्हावर दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीने पुन्हा दावा केला आहे. १९९६ पासून हे चिन्ह आपल्याकडे असल्याचे सांगत ‘समता’ने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असून यावर बुधवारी निर्णय अपेक्षित आहे. इतकेच नव्हे तर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याची घोषणाही पक्षाने केली आहे.

समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर म्हणाले, ‘जॉर्ज यांनी १९९४ मध्ये समता पार्टीची स्थापना केल्यावर १९९६ मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना मशाल हे चिन्ह दिले होते. मात्र, सोमवारी निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशात २००४ मध्ये समता पार्टीची राज्य पक्ष म्हणून मान्यता काढून घेत असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंना त्यांचे धगधगती मशाल हे चिन्ह बहाल केले. याप्रकरणी आपण निवडणूक आयोगाला ई-मेल पाठवून या चिन्हावर हक्क सांगितला. देवळेकर म्हणाले, अंधेरीत तगडा उमेदवार निवडला आहे. मात्र, एकाच चिन्हावर दोन उमेदवार असल्यास मतविभागणीची शक्यता आहे. त्यामुळेच मशाल चिन्ह इतर पक्षाला देऊ नये, अशी मागणी केली आहे.

उद्धव यांची मशाल गोल आकारात भगव्या रंगात आहे. समता पार्टीची मशाल दोन रंगांत आहे. खाली व वर हिरवा, तर मधल्या पट्ट्यात पांढरा रंग आहे. मात्र, निवडणूक मतदान पत्रिकेत किंवा मतदान यंत्रावर ब्लॅक अँड व्हाइटमध्ये चिन्ह असते. यामुळे दोन्ही चिन्हे एकसमान दिसून मतदारांत संभ्रम होईल, असे देवळेकर यांना वाटते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -