नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी आणि येथील लोकप्रतिनिधींबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या सर्वांविरोधात नाशिकचे पोलीस कर्मचारी आता एकवटले असून पोलीस आयुक्तांनी केलेल्या बदल्यांविरोधात २२ कर्मचारी ‘मॅट’मध्ये जाणार आहेत.
शहर पोलीस आयुक्तालयातील २२ कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तक्रारींचा आधार घेत शहर पोलीस आयुक्तालयातील २२ कर्मचाऱ्यांची मुख्यालयात बदली करण्यात आल्याने हे कर्मचारी आता मॅटमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. पोलीस आयुक्तांनी कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेता बंदोबस्ताकामी त्यांना तात्पुरते मुख्यालयात संलग्न केले आहे. बदली कायद्यानुसार प्रक्रिया न करता बेकायदेशीर बदल्या केल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला.
पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. आयुक्तालयातील विभाग १ व २ मधील आणि विभाग ४ मधील पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल करत आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. ८ सप्टेंबर या गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला ट्रायकिंग फोर्स कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ५ ऑक्टोबरला पंचवटी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्याचे व्हीडिओ क्लिप व मेसेज नियंत्रण कक्षाला पाठवत आत्महत्याचा इशारा दिला होता.
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना गार्डची ड्यूटी दिल्याने दारणा नदीत पुलावरून उडी मारून एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. याची गंभीर दखल पोलीस आयुक्तांनी घेत या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या घटना ताज्या असताना आता केवळ लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारींच्या आधारे पोलीस आयुक्तांनी बंदोबस्तकामी मुख्यालयात संलग्न केल्याने २२ कर्मचारी आता या विरोधात मॅटमध्ये दाद मागण्यासाठी जाणार आहेत. कर्मचाऱ्यांनी कायदेशीर सल्लागारांची भेट घेतली असून लवकरच ते याचिका दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.