मुंबई (वार्ताहर) : छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती संचलित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अनेक होतकरू तरूण क्रीडापटू घडत आहेत, ही आनंदाची व अभिमानास्पद बाब आहे. त्यामुळे राज्याच्या नावलौकिकात भर पडत आहे, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी काढले.
विलेपार्ले (पूर्व) येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या वेळी संकुलातील पदक विजेत्या यशस्वी खेळाडू आणि प्रशिक्षक यांचा प्रामुख्याने गौरव करण्यात आला. यावेळी आमदार पराग अळवणी, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू, सचिव डॉ. मोहन राणे, लीना प्रभू, राजू रावळ, मकरंद येडुरकर तसेच संकुलाच्या पदाधिकाऱ्यांसह, प्रशिक्षक, क्रीडापटू उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. रमेश प्रभू यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, डॉ. रमेश प्रभू हे लोकप्रिय लोकप्रतिनिधी होते. त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासोबतच या क्रीडा संकुलाची उभारणी केली. या क्रीडा संकुलामधून अनेक होतकरू खेळाडू निर्माण झाले.