मुंबई (वार्ताहर) : मुंबई महापालिकेत अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बदल्यांवरून आधीच चर्चा सुरू असताना घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या डॉ. संगीता हसनाळे यांच्या जागी पुन्हा चंदा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. संगीता हसनाळे यांच्याकडून घनकचरा विभागाच्या उपायुक्त पदाचा पदभार कमी करून त्या जागी परिमंडळ एकच्या उपायुक्त चंदा जाधव यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. तर परिमंडळ एकचा पदभार डॉ. संगीता हसनाळे यांच्याकडे सोपविण्यात आला. मात्र पुन्हा काही दिवसांत घनकचरा व्यवस्थापन विभागात चंदा जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर हे आदेशच रद्द करत परिमंडळ १ आणि घनकचरा व्यवस्थापन या दोन्ही जबाबदाऱ्या डॉ. हसनाळे यांच्याकडे दिल्या होत्या. तर चंदा जाधव यांना खात्याविना ठेवण्यात आले होते. मात्र आता दोन महिन्यांच्या आत डॉ. हसनाळे यांच्याकडून या विभागाचा पदभार कमी करून चंदा जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
सध्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्तपदाची जबाबदारी काढून डॉ. संगीता हसनाळे यांच्यावर परिमंडळ एकची जबाबदारी सोपविण्यात आली. तर परिमंडळ एकच्या उपायुक्त चंदा जाधव यांच्यावर घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त पदाचा पदभार सोपवण्यात आला. दरम्यान या मुळे पुन्हा एकदा पालिका आयुक्तांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.
डॉ. हसनाळे यांच्याकडे परिमंडळ एकच्या उपायुक्तपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली असली, तरी चंदा जाधव यांची या पदी नियुक्ती घनकचरा व्यवस्थापन विभागात केल्याने महानगरपालिका अभियंता संघटनेनेही नाराजी व्यक्त केली आहे.