Sunday, July 21, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यपर्सनल फोन, मेसेज सार्वजनिक करणे ही गंभीर चूक!

पर्सनल फोन, मेसेज सार्वजनिक करणे ही गंभीर चूक!

मीनाक्षी जगदाळे

आजकाल घरोघरी आपल्या सर्वांच्या हातात असलेले स्मार्ट फोन फायदे कमी पण तोटेच जास्त! अशी गत या स्मार्ट फोनमुळे झालेली आहे. खरे तर हा फोन वापरायचा कसा? आपले व्यक्तिगत आयुष्य, आपल्या घरातील खासगी गोष्टी, कौटुंबिक पातळीवरील खासगी संभाषण कसं जपायचं, आपलं सामाजिक आणि कौटुंबिक आयुष्य वेगवेगळं कसं ठेवायचं हे शहाण्यासुरत्या लोकांना सुद्धा या स्मार्ट फोन वापरण्याच्या ओव्हर स्मार्टपणामुळे समजत नाहीये. या लेखात आपण आपल्याला कौटुंबिक स्तरावर, आपल्या घरातील लोकांचे येणारे फोन कॉल्स, व्हॉट्सअॅप मेसेज अथवा घरातील अत्यंत जवळील रक्ताच्या नात्यांमधील व्हीडिओ कॉल्स याचा खासगीपणा जपणे किती आवश्यक आहे यावर चर्चा करणार आहोत. अनिता (काल्पनिक नाव) नवऱ्याच्या केवळ मोबाइल चुकीच्या पद्धतीने वापरण्याच्या सवयीला वैतागलेली महिला. अनिताला नवऱ्याच्या मोबाइल वापराबद्दलच्या सवयीचा प्रचंड उबग आला असून त्यामुळे ती आता सरळ माहेरी येऊन राहाते आहे. नवऱ्याला एकही फोन, मेसेज करायचा नाही आणि आला तरी घ्यायचा नाही हा पक्का निर्णयच तिने घेऊन टाकला आहे.

पती-पत्नीमधील सर्व संभाषण जाहीर करण्याची काय गरज आहे? अनिताच्या म्हणण्यानुसार पती-पत्नीमधील प्रत्येक संवाद त्यांच्या घरातल्या लोकांनी, पतीच्या कार्यालयातील लोकांनी ऐकणं, त्यावर चेष्टा-मस्करी करणं, विविध शेरेबाजी करणं तिच्यासाठी अत्यंत घृणास्पद होतं. अनिताच्या पतीने त्यांच्या नात्यातील संभाषणाला मर्यादा न ठेवता स्वतःसोबतच तिचेही आयुष्य असे सार्वजनिक आणि सामाजिक करणे पूर्णतः चुकीचे होते.

शोभा (काल्पनिक नाव) देखील आपल्या पतीच्या मोबाइल वापरण्याच्या पद्धतीमुळे त्रस्त होती. शोभाने पतीला कोणताही, काहीही कशाही संदर्भात व्हॉट्सअॅपवर मेसेज केला की तो हे मेसेज त्यांच्या पूर्ण घराला फॉरवर्ड करणे, त्यावर उलटसुलट चर्चा करणे, त्यावर इतरांची मतं मागवणे असले प्रकार करत असतो. शोभाचं म्हणणं होतं कितीही अर्जंट, कितीही खासगी किंवा महत्त्वाचे, गोपनीय काहीही लिहिलेलं असेल तरी माझा नवरा त्याच्या बहिणी, आई, वडील, भाऊ, इतर परिवार या सगळ्यांना माझे मेसेज वाचून दाखवतो किंवा फॉरवर्ड करतो. त्याने असं केलं की ताबडतोब मला या सगळ्यांचे फोन किंवा मेसेज सुरू होतात आणि मला हजार प्रश्न विचारून नॉनस्टॉप सल्ले, सूचना याचा भडीमार सहन करावा लागतो. तू असं का लिहिलं, असं का वाटलं तुला, हे असंच पाहिजे का, ते तसं का टाकलं त्याला, बापरे त्याला किती वाईट वाटलं, बापरे त्याला किती त्रास झाला असेल, अगं तुला काही समजतं का? गरज होती का, असा मेसेज करण्याची, अगं तुला परिस्थितीचं भान आहे का? काहीही काय लिहून पाठवतेय नवऱ्याला, अरे बापरे तू काय समजते स्वतःला आमचा भाऊ किती नाराज झाला तुझ्या अशा मेसेजमुळे, अगं शोभा ही काय वेळ होती का त्याला पैसे मागण्याची ते पण मेसेज करून?

सुहासच्या निरीक्षणानुसार त्याची पत्नी प्रियांका (काल्पनिक नाव) त्याचे, त्याच्या घरातील सगळ्यांचे फोन कॉल्स रेकॉर्डिंग करून ठेवत होती, त्यांच्या घरातील, सासरच्या सर्व लोकांचे टेक्स्ट मेसेज, व्हाॅट्सअॅप मेसेज, त्यांनी ठेवलेले स्टेट्स याचे ती स्क्रीनशॉट काढून ठेवत असे. याहून कहर म्हणजे हे सर्व ती स्वतःपुरतं, स्वतःच्या मोबाइलमध्ये न ठेवता तिच्या माहेरील मंडळींना वारंवार आणि वेळोवेळी पाठवत होती. सुहासचं म्हणणं होतं मी बायकोला प्रेमाने, खासगी स्वरूपाचा केलेला मेसेज असो, वा आमच्या दोघांचे कोणतेही फोटो व्हीडिओ असो ते आमचं खासगी आयुष्य आहे. माझ्या घरातल्या लोकांनी तिच्याशी फोनवर केलेले संभाषण असो हे सगळं रेकॉर्डिंग करून ठेवण्यात आणि माहेरी सतत फॉरवर्ड करण्यात काय अर्थ आहे. प्रियांकाच्या या सवयीमुळे सुहासला आणि त्याच्या घरच्यांना अतिशय अवघडल्यासारखं झालं होतं. आपलं काही चुकतंय का, आपलं बोलणं, वागणं हिला पटत नाहीये का, आपल्याला कोर्टात खेचायला वगैरे तर ही काही पुरावे जमा करत नाही ना अशा नाना शंका सुहासच्या घरी निर्माण झाल्या होत्या. त्याच्या वयस्कर आई-वडिलांची या गोष्टीच टेंशन घेऊन तब्बेत खराब झाली होती, त्यांना घरात वावरताना पण प्रियांका काही रेकॉर्डिंग तर करत नसेल ना ही धास्ती मनात भरली होती. सुहास तर बायकोला असं वागू नकोस हे सांगून थकला होता.

आपल्याकडे सर्व सुविधांनी युक्त मोबाइल फोन आहेत म्हणून त्याचा वापर इतरांना त्रास द्यायला, इतरांचं वैयक्तिक खासगी आयुष्य चव्हाट्यावर आणायला जर आपण वापरत असाल तर ती गंभीर चूक आहे हे लक्षात घ्यावे. दोन व्यक्तींमधील संवाद, मेसेज जर त्यातील एकजण सार्वजनिक करीत असेल, तर आपण स्वतःहून आपली प्रतिमा खराब करीत आहोत, समोरील व्यक्तीचा आपल्यावर असलेला विश्वास आपण तोडत आहोत याचे भान असू द्यावे. ज्या गोष्टी समोरील व्यक्ती फक्त तुमच्याशी बोलू इच्छिते अथवा तुम्हाला सांगू इच्छिते त्या गोष्टींना इतरत्र पसरविण्याचा आपल्याला हक्क नाही हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. असे बेजबाबदार पद्धतीने मोबाइल वापरणे अनेक गुन्ह्यांना आमंत्रण देऊ शकते, तुम्हाला अथवा समोरच्या व्यक्तीला गोत्यात आणू शकते, नात्यांमध्ये दुरावा निर्माण करू शकते आणि मुळात तुमचं आयुष्य खासगी न राहता सार्वजनिक होते. त्यामुळे समोरील व्यक्तीच्या पूर्वपरवानगी शिवाय अथवा तितकंच आवश्यक असल्याशिवाय स्वतः पण इतके उघडे पडू नका आणि आपल्याला विश्वासाने फोन, मेसेज करणाऱ्या व्यक्तीला पण अपमानित वाटेल असं वागू नका.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -