Monday, April 28, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखचिन्हांच्या गावा जावे...

चिन्हांच्या गावा जावे…

चिन्ह ही राजकीय पक्षांची ओळख असते. आपले विचार जनमानसावर पोहोचविणारी ती एक निशाणी असते. राजकीय पक्षांच्या दृष्टीने निवडणूक आयोगाकडून कायमस्वरूपी ती ओळख मिळावी यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांची धडपड सुरू असते. राजकीय पक्षांना आयोगाच्या निकषाप्रमाणे निवडून आलेल्या आमदार, खासदारांची संख्या आणि निवडणुकीत पडलेल्या एकूण मतांची टक्केवारी ही कायमचे चिन्ह देताना लक्षात घेतली जाते. त्यानंतर राजकीय पक्षांकडून दिलेल्या पर्यायांतून एक चिन्ह निवडणूक आयोगाकडून त्या पक्षाला दिले जाते. त्यानंतर देशात निवडणूक लढविणाऱ्या कोणत्याही अन्य पक्षांच्या किंवा अपक्ष उमेदवाराला त्या चिन्हांवर हक्क दाखवता येत नाही. त्यामुळे निवडणूक चिन्हाला एक वेगळे महत्त्व आहे.

पक्षाची विचारधारा, पक्षाला मानणारा मतदार वर्ग यांच्या भावना लक्षात घेऊनच, पक्षाला लाभदायक वाटणारे चिन्ह निवडले जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर, राज्यात राजकीय चिन्हांवरून चर्चा सुरू झाली. शिवसेनेला १९८९ साली धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने बहाल केले होते. जहाल विचाराचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेला धनुष्यबाण हीच निशाणी शोभून दिसेल हे बाळासाहेबांनी त्यावेळी ओळखले होते. हिंदुत्वाच्या विचारांचा पुरस्कार करणाऱ्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने त्यासाठी प्रभू रामचंद्राच्या हातातील धनुष्यबाण निवडला. सध्या निवडणूक आयोगापुढे शिवसेनेच्या दोन गटांचा वाद सुरू आहे. आमचा पक्ष हीच खरी शिवसेना असा दावा दोन्ही गटांकडून करण्यात आला तेव्हा निवडणूक आयोगाने अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक लक्षात घेऊन शिवसेनेचे चिन्ह गोठवले आणि दोन्ही पक्षांना स्वतंत्र नाव आणि चिन्ह सुचविण्याचे तीन पर्याय दिले. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले, तर सेनेच्या शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह मिळाले. या चिन्हांचे पर्याय आयोगापुढे देतानासुद्धा दोन्ही गटांकडून कोणती चिन्हे निवडायची यावर विचारमंथन नक्कीच केले असणार. देशातला सर्वात मोठा पक्ष म्हणून आज भारतीय जनता पार्टीकडे पाहिले जाते. १९८० साली भाजपची स्थापना झाली. या पक्षाची राष्ट्रीय पक्ष म्हणून नोंदणी करताना कमळ हे चिन्ह निवडले. कमळाला हिंदुशास्त्रात पवित्र स्थान आहे. लक्ष्मी मातेचे ते आवडते फूल मानले जात असल्याने देवीच्या पूजेत कमळ हे चरणापाशी दिसते. कमळाबाबत कोणताही नकारात्मक विचार मनात येत नाही. चिखलातून कमळ फुलताना ते स्वत:चे पावित्र राखते हा विचार आधी भारतीयाच्या मनात बिंबलेला आहे. विशेष म्हणजे कमळ हे राष्ट्रीय फूल असल्याने त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी चिन्हांची निवड करताना किती दूरदृष्टीचा विचार केला होता, हे आता दिसून येते.

राष्ट्रीय पक्ष असो किंवा प्रादेशिक पक्ष असो. चिन्हांची निवड करताना त्यामागील त्या पक्षाचा विचार आणि ते चिन्ह घराघरांत कसे पोहोचेल, यासाठी राजकीय पक्षाचे प्रयत्न असतात. आज शिवसेनेत दोन गट पडले. तशी प्रकरणे निवडणूक आयोगापुढे या आधी आली होती. काँग्रेस पक्षात दुफळी माजली होती. गाय-वासरू हे चिन्ह आयोगाने गोठवले होते. त्यानंतर इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस (आय)ला हात निशाणी मिळाली होती. या चिन्हाबरोबर अनेक आख्यायिका सांगण्यात आल्या. इंदिरा गांधी यांना आदि शंकराचार्यांनी हात दाखवला आणि तेच निवडणूक चिन्ह घ्यावे असे सुचविले होते. हीच हात निशाणी घेऊन इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या.

या आख्यायिका किती खऱ्या आहेत यामागे संशोधन करण्यात काही अर्थ नाही. मात्र उमेदवाराच्या नावापेक्षा पक्षांचे चिन्ह इतके महत्त्वाचे असते की, एखाद्या दगडाला निवडणुकीचे तिकीट दिले, तर निवडून येतो असे म्हटले जाते. कारण त्या चिन्हात पक्षाची ताकद दडलेली असते. आपला देश

कृषीप्रधान असल्याने, इंदिरा गांधींच्या सत्तेला आव्हान देणाऱ्या जनता पार्टीची निशाणी ही त्या काळी नांगरधारी शेतकरी ही होती. उत्तर प्रदेशात तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले दिवंगत मुलायमसिंह यादव यांच्या समाजवादी पार्टीने स्थापनेच्या वेळी चिन्हाची निवड करताना सायकल ही निशाणी निवडली. उत्तर प्रदेशसारख्या मागास भागात दळणवळणाची साधने कमी असताना, सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी सायकल या चिन्हावर त्यांनी राज्याची सत्ता संपादन केली होती. देशभरातील राजकीय पक्ष आणि त्यांची विचारधारा यांचा सखोल अभ्यास केला, तर चिन्ह निवडताना त्या त्या पक्षांनी मोठी काळजी घेताना दिसून आली आहे. चिन्ह हे निवडणुकीतील एक निशाणी असली तरी त्या पक्षाच्या अस्मितेशी नाळ जोडली जाते. प्रचार सभेत, संबंधित पक्षाच्या राजकीय व्यासपीठावर किंवा कोणताही समाजोपयोगी कार्यक्रम पक्षाने घेतला असेल, तर त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या नावासोबत चिन्हाला मानाची जागा असते. पक्षाचे चिन्ह हे पक्षांचे कार्यकर्ते घरोघरी पोहोचविण्याचा प्रयत्न करत असतात.

भारतीय लोकशाहीत निवडणूक आयोगाला स्वायत्तता देण्यात आली असून, निवडणुकीच्या वेळी गुप्त मतदान पद्धतीने चिन्हावर शिक्का मारून मतदान करण्यात येते. त्यामुळे चिन्हांची लोकप्रियता हा एक भाग असला तरी, जो उमेदवार जनतेच्या मनात आहे त्याच्या नावापुढील चिन्हांवर शिक्का मारून त्याला निवडून देण्याची क्षमता सजग लोकशाहीत जनतेला बहाल करण्यात आली आहे. चिन्ह हे प्रत्येक पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात असले तरी, निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा गटाच्या उमेदवाराला निवडून द्यायचे हे जनता ठरवते. त्यामुळे चिन्हांच्या गावातून जाताना कोणते चिन्ह जनतेच्या मनात दडलेले आहे, हे त्या त्या काळात झालेल्या निवडणुकीत सद्ध झाले आहे. यापुढेही चिन्हांचे महत्त्व जनताच अधोरेखित करेल, यात शंका नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -