सद्गुरू वामनराव पै
ज्ञान हे महत्त्वाचे आहे व ज्ञान हाच देव आहे असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. मग ते कुठलेही ज्ञान असेल. कुठलेही ज्ञान हा देवच आहे. कारण त्याशिवाय तुम्ही जगूच शकत नाही. निद्रा, आहार, भय, मैथुन याशिवाय तुम्ही जगणार कसे? निद्रा, आहार, भय, मैथुन हा चौरंग आहे व तुमचे सगळे जीवन या चौरंगावर व जीवनाचे सगळे रंग या चौरंगात आहेत. कुठलेही ज्ञान हे श्रेष्ठच असते. स्वयंपाक करण्याचे ज्ञान. उत्तम झाडू मारण्याचे ज्ञानसुद्धा ज्ञेष्ठच आहे. सर्व प्रकारचे ज्ञान हे श्रेष्ठच असते व सर्व प्रकारचे ज्ञान हे देवच आहे. मुळात ते ज्ञान दिव्यच होते पण त्याची दिव्यता घसरत घसरत खाली आली इतकाच काय तो भाग. मुळात ते दिव्यच. मुळात तो राजाच. त्याचे डोके फिरले व राजवाड्यात तो भिक मागू लागला. जरी तो राजवाड्यात भिक मागत असला तरी मुळात तो राजाच. तसे हे ज्ञान मुळात दिव्यच पण घसरत घसरत ते खाली आले. हे दिव्य ज्ञान घसरत घसरत खाली आले व सामान्य ज्ञान झाले. इतकेच नव्हे तर त्या ज्ञानावर कित्येक ठिकाणी कुसंस्कार झालेले आहेत. या ज्ञानावर निरनिराळ्या प्रकारचे संस्कार झाले व त्या संस्कारामुळे ते दिव्य ज्ञान विकृत झाले. जे दिव्य होते ते आज विकृत झालेले आहे. आज दंगेधोपे का होतात? दंगे करणाऱ्यांकडे ज्ञानच असते. अगदी दारू पिणाऱ्यांकडे हे पिण्यासाठी कुठे जायचे, दारूचा गुत्ता कुठे, त्यासाठी लागणारे पैसे वगैरे वगैरे ज्ञानच आहे. म्हणजचे ज्ञानावाय काहीच नसते. ते ज्ञान जर कलंकित झाले तर ते विकृत होते. आज आपण ज्या संस्कारांचा बडेजाव करतो त्यातील काही संस्कारांनीच आपला घात केलेला आहे हा जीवनविद्येचा सिध्दांत आहे. आज निरनिराळ्या प्रकारच्या संस्कृती आहेत. त्यातून निरनिराळ्या प्रकारचे संस्कार होत असतात. या संस्कारांनी आपल्याला संकुचित केलेले आहे. Mind Conditioned केलेले आहे. इतर धर्मियांचा द्वेष, मत्सर, तिरस्कार करायला इतकेच नव्हे तर ठार मारायलाही शिकविले जाते. यासाठी सर्व संस्कृतींमध्ये मानवी संस्कृती श्रेष्ठ असे जीवनविद्या सांगते. जीवनविद्या सांगते तुम्ही संस्कार करा पण ते आजच्या संस्कृतीचे नको. कारण या संस्कारांनी माणूस संकुचित होत जातो. आज निरनिराळे धर्म आहेत या धर्मांच्या नावाखाली किती युद्धे आणि रक्तपात झाला? धर्म स्वीकारत नाहीत.
जाळून टाका मारून टाका. पुरातन काळापासून व अजूनही धर्माच्या नावाखाली हा प्रकार चालूच आहेत. हे मी सांगतो आहे कारण संस्कृतीतून संस्कार येतात व हे संस्कार जर विकृत असले तर माणसाच्या ठिकाणी विकृती निर्माण होते व ही विकृती जगाच्या दुःखाला कारणीभूत ठरते. सर्वांच्याच म्हणजे त्याच्या स्वतःच्या व इतरांच्या दुःखाला ही विकृती कारणीभूत ठरते म्हणून जीवनविद्येने मानवी संस्कृती सांगितली. मानवी संस्कृती म्हणजे काय? मानवी संस्कृती म्हणजे समता. सभ्यता सामंजस्य सहिष्णूता समाधान लवचिकता नम्रता आणि कृतज्ञता. मानवी संस्कृतीचे हे आठ पैलू आहेत. हे सर्वच पैलू महत्त्वाचे आहेत. पण कृतज्ञता हा सर्वात महत्त्वाचा पैलू असे मी म्हणेन. माणसाकडे कृतज्ञता जर असेल तर त्याचे तर कल्याण होईलच पण सर्वांचेच कल्याण होईल. एक जरी पैलू अनुभवाला घेतला तरी बाकीचे सर्व पैलू तिथे येतात. एक सामंजस्य असेल तर बाकीचे सर्व पैलू तिथे येतात. एक नम्रता असेल तर बाकीचे सर्व पैलू तिथे येतात. एक तरी अनुभवाला घ्यावा. “नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी”। तसे मानवी संस्कृतीचा एक तरी पैलू अनुभवाला घेतलात तरी बाकीचे सगळे पैलू तिथे येतात. आता हे अनुभवाला घ्यायचे की न घ्यायचे हे तू ठरव म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.