Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणमुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी जुलै २०२३ अंतिम मुदत

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी जुलै २०२३ अंतिम मुदत

महामार्ग विभागाची उच्च न्यायालयात माहिती

चिपळूण (प्रतिनिधी) : गेल्या पाच वर्षापासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. दरवर्षी काम पूर्ण करण्याची नवीन डेडलाईन देण्यात येते. या मार्गावरील इंदापूर ते झारापदरम्यानच्या ३५५ किमीपैकी २४७ किमीचे काम पूर्णत्वास गेले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाकेड ते झारापपर्यंतचे शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे तर एकूण महामार्गाचे काम ७३.५४ टक्के पूर्ण झाले आहे. जुलै २०२३ पर्यंत अंतिम मुदत असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाने मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान दिली.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर डिसेंबर २०१७ पासून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. इंदापूर ते झाराप या ३५५.२८० किलोमिटर अंतरासाठी ६ हजार १०० कोटीचा खर्च प्रस्तावित आहे. यापैकी आतापर्यंत ३३१५.२१ कोटीचा खर्च झाला आहे. गेल्या ५ वर्षाच्या कालावधीत या राष्ट्रीय महामार्गाचे काम विविध कारणांनी रखडले; मात्र गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौपदरीकरणाचे काम शंभर टक्के पूर्णत्वास गेले; मात्र रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात चौपदरीकरणाची दयनीय अवस्था आहे. या कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याने चिपळूणचे सुपुत्र अॅड. ओवेस पेचकर यांनी या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

गेल्या काही महिन्यापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू असून राज्य सरकार व राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रत्येक सुनावणीदरम्यान चौपदरीकरणाची माहिती न्यायालयास देण्यात येत आहे. याबाबत सोमवारी (ता. १०) उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. पावसाळ्यात चौपदरीकरणाचे काम निराशाजनक असल्याचे निदर्शनास आले. चिपळूणच्या हद्दीत एकूण ३४.४५० किमीचे चौपदरीकरण केले जाणार आहे. या कामाचा ठेका डिसेंबर २०१७ मध्येच ईगल चेतक कंपनीस देण्यात आला. या टप्प्यातील चौपदरीकरणासाठी ६७० कोटीचा खर्च असून प्रत्यक्षात १८६ कोटी ७४ लाखाचा खर्च झाला आहे. ३५ किमीपैकी ८.३५ किमी चौपदरीकरणाचे काम बाकी असून एकूण काम ६२ टक्के झाले आहे. जुलै २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याची हमी राष्ट्रीय महामार्गाने न्यायालयात दिली.

राष्ट्रीय महामार्गावर आरवली ते कांटेदरम्यान सर्वार्धिक कूर्मगतीने चौपदरीकरणाचे काम झाले आहे. गेल्या ५ वर्षात या ३९ किमीच्या टप्प्यात केवळ २२ टक्केच काम पूर्ण झाले. तरीही डिसेंबर २०२३ पर्यंत येथील काम पूर्ण करणार असल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग विभागाने न्यायालयात केला. या टप्प्यात ५९२ कोटी ९८ लाख रुपये खर्च असून प्रत्यक्षात ५३ कोटी ९० लाखाचा खर्च झाला आहे. येथे अद्याप ३०.८४ किमीचे काम बाकी आहे. यापुढील कांटे ते वाकेडदरम्यानची कामेदेखील रखडलेलीच आहेत. येथेही ५ वर्षाच्या कालावधीत केवळ २४ टक्के काम झाले असल्याचे राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांनी सुनावणीदरम्यान सांगितले आहे. याबाबत पुढील सुनावणी १४ नोव्हेंबरला होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -