Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

नाशिकमध्ये खोटी वर्क ऑर्डर देऊन साडेअकरा लाखांची फसवणूक

नाशिकमध्ये खोटी वर्क ऑर्डर देऊन साडेअकरा लाखांची फसवणूक

नाशिक (प्रतिनिधी) : शासकीय योजनेच्या कामासाठी कोणतेही साहित्य, मशिनरी न पुरविता खोटी वर्क ऑर्डर देऊन एका तरुणाची साडेअकरा लाख रुपयांना फसवणूक करणाऱ्या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तौसिफ खान आयुब खान (वय २४, रा. विवरे खुर्द, ता. रावेर) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी निखिल विजयानंद अहिरराव (वय ४२, रा. श्री लक्ष्मीनिवास, लीलावती हॉस्पिटलमागे, मखमलाबाद रोड, नाशिक) याने त्याच्या मालकीच्या इन्स्पायर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीतून ‘वन नेशन वन रेशन स्मार्ट कार्ड’ या शासकीय योजनेची फेसबुक या सोशल माध्यमाद्वारे जाहिरात केली होती. ही जाहिरात पाहून फिर्यादी तौसिफ खान याने अहिरराव यांच्याशी संपर्क साधला.

दरम्यान, अहिरराव यांनी फिर्यादी तौसिफ खान यांना नाशिक रोड येथील पंचकच्या जवळ असलेल्या शनी मंदिरानजीक सरस्वतीनगर बंगला येथे बोलावले. त्यावेळी आरोपी अहिरराव याने फिर्यादी खान याला कंपनीमार्फत वन नेशन वन रेशन स्मार्ट कार्ड या शासकीय योजनेची माहिती देऊन त्या कामासाठी लागणारे साहित्य व मशिनरी पुरविण्यासाठी खान यांच्याकडून दि. १५ नोव्हेंबर २०१९ ते दि. ४ जानेवारी २०२२ या कालावधीत वेळोवेळी बँकेद्वारे ११ लाख ४० हजार रुपयांची रक्कम उकळली; मात्र एवढी मोठी रक्कम देऊनही आरोपी अहिरराव याने खान यांना या योजनेच्या कामासाठी लागणारे साहित्य व मशिनरी न पुरविता खोटी वर्क ऑर्डर देऊन पैसे उकळले.

मात्र पैसे देऊनही काम होत नसल्याने खान यांनी आरोपी अहिरराव याला दिलेली रक्कम परत मागितली. मात्र अहिरराव याने खान यांना जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर तौसिफ खान यांनी नाशिक रोड पोलीस ठाणे गाठून आरोपी अहिरराव याच्याविरुद्ध फसवणूक व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक पाचोरकर करीत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >