अलिबाग (प्रतिनिधी) : केंद्र शासनाने खरीप पणन हंगाम २०२२-२३ अंतर्गत राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता शेतकरी नोंदणी करण्याबाबत कळविले होते. त्यानुषंगाने मंजूर झालेल्या धान व भरडधान्य खरेदी केंद्रावर सब एजंट संस्थांमार्फत धान व भरडधान्य शेतकरी नोंदणीची अंतिम मुदत दि.१५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत होती.
परंतु, एनइएमएल पोर्टलवरील मागील हंगामातील दि.११ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या शेतकरी नोंदणीच्या अहवालानुसार शेतकरी नोंदणी अल्प प्रमाणात झाल्याचे दिसून आले. या कारणास्तव धान व भरडधान्य खरेदीकरिता एनइएमएल पोर्टलवर शेतकरी नोंदणी करण्यासाठी दि.२५ ऑक्टोबर २०२२ रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
त्यानुसार शेतकरी नोंदणी करताना या हंगामापासून ज्या शेतकऱ्यांचा ७/१२ आहे. त्याच शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे, त्याशिवाय नोंदणी पूर्ण होत नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे त्याच शेतकऱ्याने लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वतः खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
तरी ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे, त्या शेतकऱ्यांनी नोंदणीकरिता लाईव्ह फोटो अपलोड करण्याकरिता स्वतः उपस्थित राहावे. शेतकरी नोंदणीची अंतिम मुदत दि.२५ ऑक्टोबर २०२२ असल्यामुळे दिलेल्या मुदतीतच शेतकरी नोंदणी पूर्ण करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत शेतकरी नोंदणीकरिता ऑफलाईन अर्ज स्विकारण्यात येणार नाही, याची संबंधित सब एजंट संस्थानी नोंद घ्यावी, असे दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडचे सरव्यवस्थापक डॉ.अतुल नेरकर यांनी सूचित केले आहे.