Wednesday, September 17, 2025

परतीच्या पावसाचा मार्ग रेंगाळला, शेतकरी हवालदील!

परतीच्या पावसाचा मार्ग रेंगाळला, शेतकरी हवालदील!

मुंबई : ऑक्टोबर महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला तरीही राज्यात पावसाचा मुक्काम कायम असल्यामुळे ऐन सुगीच्या काळात शेतातील तयार झालेल्या उभ्या पीकाची डोळ्यादेखत नासाडी होत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.

संपूर्ण राज्यातून १५-१६ ऑक्टोबरदरम्यान नैऋत्य मोसमी वारे माघारी फिरतात. परंतु राज्यात अद्यापही पावसासाठी पोषक वातावरण दिसून येत असल्याने परतीच्या पावसाबाबत नेमकी कल्पना तीन किंवा चार दिवसांनीच स्पष्ट होईल, अशी माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिली.

सोमवारी सायंकाळी बराच वेळ पुण्यात परतीच्या पावसाने पुणेकरांना भिजवले. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही तासांसाठी पाऊस झाला. कोकण आणि विदर्भातही हलक्या पावसाच्या सरी सुरु आहेत. त्यामुळे राज्यात परतीच्या पावसाला अद्यापही पोषक वातावरण नसल्याचे होसाळीकर यांनी स्पष्ट केले.

देशाच्या उत्तर तसेच दक्षिण भागांतही परतीचा पाऊस सक्रीय आहे. त्यामुळे राज्यातून नैऋत्य मोसमी वारे परतण्याबाबत आता काहीच ठाम बोलता येत नसल्याचे होसाळीकर यांनी सांगितले.

सोमवारी केंद्रीय वेधशाळेच्या अंदाजानुसार, देशाच्या वायव्य आणि मध्य भारतातून मान्सून परतायला तीन ते चार दिवसांनी पोषक वातावरण तयार होईल. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा आणि महाराष्ट्र हे राज्य मध्य भारतात गणले जातात. आठवड्याभरापूर्वी गुजरात आणि मध्य प्रदेशातील काही भागांतून परतीचा पाऊस माघारी परतला होता. त्यानंतर उत्तर तसेच मध्य भारतात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे आठवड्याभरापासून परतीच्या पावसाचा मार्ग रेंगाळला आहे. उत्तराखंड आणि बिहार राज्यातील ब-याचशा भागांतून पाऊस परतलेला नाही. त्यातच उत्तर आणि दक्षिण भारतात पावसासाठी पोषक वातावरण दिसून येत आहे. राज्यातही बुधवारपर्यंत पावसाची हजेरी सुरु राहील, त्यामुळे तीन-चार दिवसानंतर महाराष्ट्रातून परतीच्या पावसाबाबत नेमकी कधी सुरुवात होईल, याचा अंदाज वर्तवणे योग्य राहील, असेही होसाळीकर यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment