चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे १३ ऑक्टोबरपासून राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा डेरवण येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियमवर १३ ते १६ ऑक्टोबरदरम्यान खेळली जाणार आहे. स्पर्धेत देशभरातून ५२८ खेळाडू, ४४ मार्गदर्शक, ४४ व्यवस्थापक आणि २८ पंच सहभागी होतील. महत्वाचे म्हणजे, देशभरातील २२ राज्यांतील खेळाडू या स्पर्धेत सहभाग दर्शवणार आहेत. ज्यात महाराष्ट्रासह बिहार, हरियाणा, केरळ, मध्यप्रदेश, गुजरात, तामिळनाडू, चेन्नई, मुंबई, उत्तरप्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, चंदीगड, मध्यभारत, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेश यांसारख्या राज्यांचा समावेश आहे.या प्रत्येक राज्याने मुले व मुली गटात सहभाग नोंदवलेला आहे.
डॉजबॉल हा खेळ आनंद देणारा व नेमबाजी, स्फोटक ताकद, चलाखी, चपळाई, समन्वय या सर्वांचा कस लावणारा आहे. दहा वर्षांपूर्वी शालेय स्पर्धेत तसेच पोलीस गेममध्ये याचा समावेश झाला. अनेक देशांमध्ये हा खेळ खेळला जातो. रत्नागिरी जिल्ह्यामधूनसुद्धा आत्तापर्यंत अनेक खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्पर्धा खेळलेले आहेत. डेरवण येथे पार पडणाऱ्या डॉजबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या राज्याने आपापल्या उत्कृष्ट खेळाडूंची निवड केली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडू चांगली कामगिरी बजावतील, अशी अपेक्षा केली जात आहे.
बंगळुरू येथील सेंट फ्रान्सिको कॉलेज मध्ये २४ ते २६ जून २०२२ रोजी ज्युनिअर राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने द्वितीय स्थान पटकावले. त्यात कारंजा येथील गौरी तायडेने महाराष्ट्र संघाकडून सहभाग नोंदवत उत्कृष्ट कामगिरी बजावली. गौरी ही भरारी स्पोर्ट्स फाऊंडेशनची खेळाडू आहे. ती व्यवसायिक दिलीप तायडे व आर.जे.सी. येथील शिक्षिका प्रगती तायडे यांची कन्या आहे.