मुंबई : आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतला आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज रंगशारदा येथे बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी, आगामी महानगरपालिका निवडणुका आपल्याला स्वबळावर लढायच्या आहेत. त्यासाठी कामाला लागा. तुम्ही फक्त प्रामाणिकपणे काम करा. तुम्हाला सत्तेत बसवण्याची जबाबदारी माझी, असे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
यावेळी राज ठाकरेंनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आपले मत व्यक्त केले. राज यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या वादावर फार थेटपणे भाष्य केले नाही. परंतु, राज्यातील जनता सध्याच्या राजकारणाला वैतागली आहे. अनेक लोकांनी दोन्ही दसरा मेळावे पाहिले नाहीत. याउलट मनसेबाबत लोकांमध्ये सकारात्मक वातावरण आहे. याचा फायदा घ्या. दिवाळीत घरोघरी जाऊन प्रचार करा. सकारात्मक आणि प्रामाणिकपणे काम करा. तुम्हाला सत्तेत बसवण्याची जबाबदारी माझी. तसेच सत्ता आल्यावर मी तुम्हालाच पदावर बसवेन, मी कोणतेही पद घेणार नाही, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला आहे.