मुंबई (प्रतिनिधी) : भारतात नवे उद्योजक आणि उत्पादन तसेच निर्यात वाढवण्याची जास्त गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सूक्षम, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले आहे. कनफेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) या संस्थेच्या परिषदेत ते बोलत होते.
कफ परेड येथील ताज विवांता हॉटेल येथे सीआयआय च्या ८ व्या परिषद व प्रदर्शनानिमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते, यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. सीआयआय म्हणजे भारतीय उद्योग महासंघाच्या आठव्या परिषदेत भविष्याकडील पर्यावरण, वित्त आणि निर्यात या विषयावरील विविध परिषद भरवण्यात आली. या परिषदेत पर्यावरणमुक्त उत्पादने, त्यांची शाश्वतता, वित्त, व्यवसाय आणि निर्यात यासारख्या समस्या कशा हाताळायचा व समजून घ्यायच्या याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जागतिक स्तरावर व्यवसायातील स्पर्धात्मकता टिकवण्यासाठी काय करावे याबाबत अधिक माहिती या परिषदेतून मिळेल.
आयात पेक्षा निर्यात जास्त झाली पाहिजे यावर भर दिला पाहिजे असे नारायण राणे यांनी सांगितले. सीआयआय ही संस्था १२५ वर्ष जुनी संस्था असून या संस्थेत २००० मोठे उद्योग तर ३ लाख सूक्ष्म आणि लघुउद्योग आहेत. या परिषेदेत येऊन या संस्थेकडून उद्योग वाढवण्यासाठीचा अनुभव आपण घ्यावा आणि जे नवीन उद्योजक बनू पाहत आहेत, त्यांना मार्गदर्शन करता यावा यासाठी या संस्थेने मदत करावी, असे ते म्हणाले. यासाठी लवकरच सीआयआयसोबत एक संयुक्त बैठक घेणार असून नवीन उदयोजकांना कशाप्रकारे सहकार्य करू शकतो तसेच आयात कमी व्हावी आणि निर्यात वाढवावी, तसेच नवीन उत्पादन व्हावी यासाठी चर्चा करणार असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.
आपल्या देशात उद्योजकांची संख्या आणि उत्पादन वाढायला हवे. देशाचा जीडीपी वाढायला हवा, भारत हा आत्मनिर्भर बनावा यासाठी सीआयआयची आवश्यकता आणि सहकार्य गरजेचे आहे. तसेच देशासाठी या संस्थेचे आतापर्यंतचा विकास केलेला आहे, या संस्थेने नवीन तंत्रज्ञान आणून उत्पादन वाढवायचे असल्याचे ही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.