मुंबई (प्रतिनिधी) : बेस्ट उपक्रम अनेकदा कामगारांच्या बाबतीत उदासीन असल्याचे पाहायला मिळते, त्यातच आता तिकीट मशीन नादुरुस्त झाल्यास त्यासाठी वाहकाला जबाबदार धरून दंड वसूल करण्यात येणार आहे. बेस्ट प्रशासनाकडून याबाबतचा फतवा काढण्यात आला आहे. याचा विरोध करत कामगारांनी बेस्ट वर्कर्स युनियनच्या मार्गदर्शनाखाली वडाळा आगारात आंदोलन केले.
मुंबईकरांना कमी दरात बेस्ट चांगली सेवा देते. मात्र दुसरीकडे कामगारांच्या बाबतीत भेदभाव करत असल्याचा आरोप नेहमी बेस्टवर केला जातो. बेस्टकडून तिकीट मशीन नादुरुस्त झाल्यास त्यासाठी वाहकाला जबाबदार धरून त्याच्याकडून याचा दंड वसूल करण्यात येणार असल्याचे परिपत्रक बेस्टकडून जाहीर करण्यात आले.
यात मशीन मागील कव्हरसाठी १५८२ रुपये, बॅटरी कव्हरसाठी ११०५ रुपये, बॅटरीसाठी २२१४ रुपये, थर्मल प्रिंटरकरिता १८०३ रुपये, एलइडी कव्हरसाठी ४७३७ रुपये, मेन बोर्डसाठी ८४३८ रुपये, वायफाय अँटीना ब्रॅकेटसाठी ९६० रुपये, तर पेपर फ्लॅपकरिता ९६० रुपये अशी किंमत वसूल करण्यात येणार असल्याचे पत्रक बेस्ट प्रशासनाने काढले. त्यावर कर्मचाऱ्यांना होणाऱ्या या भूर्दंडाविरोधात बेस्ट वर्कर्स युनियनकडून आंदोलन करण्यात आले.
दरम्यान या निर्णयाविरोधात मंगळवारी केवळ निदर्शने करून आंदोलन करण्यात आले आहे. त्यानंतर झालेल्या बैठकीत बेस्ट प्रशासनाकडे आम्ही हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली असून युनियनकडून दिवाळीपर्यंत वाट पाहण्यात येईल, अन्यथा दिवाळीनंतर आंदोलन करण्यात येईल. – शशांक राव, बेस्ट वर्कर्स युनियन अध्यक्ष