शिबानी जोशी
राष्ट्रसेविका समितीच्या शाखा देशभर चालतात आणि शाखा कार्याबरोबरच महिला कार्यकर्त्या महिलांचं आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक सबलीकरण करण्यासाठी विविध उपक्रम राबवत असतात. यामध्ये बहुतांश ठिकाणी महिलांचे शिक्षण, आरोग्य, त्यांच्या हाताला काम देऊन स्वावलंबी बनवणे तसेच संस्कारक्षम वाटचाल करणे यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. मुंबईमध्ये बकुळ ताई देवकुळे यांनी गृहिणी विद्यालयाची स्थापना केली होती. या ठिकाणी शिवणकामासारखे गृहपयोगी शिक्षण द्यावं अशी योजना होती. ते पाहता नागपूरमध्येही अशा प्रकारचं शिक्षण द्यायला सुरुवात झाली. राष्ट्र उत्थानासाठी महिलांना शिक्षण ही भूमिका घेऊन १९८२ साली नागपुरात काम सुरू करण्यात आले. समितीच्या संस्थापिका वंदनीय मावशी केळकर यांचा विचार होता की, राष्ट्रधर्माच्या कामामध्ये शिक्षक, वक्ता, नेता आणि लेखक खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यांनी मनावर घेतलं तर ते समाजाला योग्य दिशेला वळवण्याचे काम करू शकतात. हाच विचार मनात ठेवून महिला कला निकेतनमध्ये महिलांना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन आत्मनिर्भर आणि आत्मविश्वास पूर्ण जगण्यासाठी मदत करण्याचं काम सुरू झाले. राष्ट्र सेविका समितीच्या माझी प्रमुख संचालिका वंदनीय उषाताई चाटी यांच्या चुलत सासुबाईंचा वाडा होता, तो त्यांनी महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला दान केला. त्यामुळे त्या जागेत महिलांना सबल, सक्षम आणि सुसंस्कारित करण्यासाठी शिक्षण देण्याचा उद्देश मनात ठेवून महिला कलानिकेतनच्या कामाला खऱ्या अर्थान सुरुवात झाली आणि ट्रस्टची स्थापना झाली. ट्रस्टच्या पहिल्या अध्यक्ष कुसुमताई साठे होत्या आणि लीलाताई आठवले पहिल्या सचिव होत्या. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे महिला कलानिकेतनचे काम सुरुवातीच्या काळात जोमाने सुरू झाले.
त्यानंतरच्या अध्यक्ष सुहास ताई मुंडले आणि सचिव प्रेरणा जमादार यांनी मनावर घेतले आणि त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे वाड्याच्या जागी तीन मजली इमारत महिलांच्या प्रशिक्षणासाठी उभी राहिली. संस्थेद्वारे बाल शिक्षिका प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि क्राफ्ट शिक्षिका प्रशिक्षण अभ्यासक्रम हे दोन कोर्स नागपूर विद्यापीठाशी संलग्नतेने सुरू झाले. आतापर्यंत एक हजारांहून अधिक महिलांनी हा प्रशिक्षण कोर्स पूर्ण केला असून त्यातील अनेक महिला अध्यापक किंवा मुख्य अध्यापक म्हणून कार्यरत झाल्या आहेत. लहान मुले ही देशाची भवितव्य असतात, त्यांना संस्कारक्षम शिक्षण द्यावं याकरता अंकुर प्री स्कूल सुरू करण्यात आले. नोकरी करणाऱ्या महिलांच्या मुलांची सोय व्हावी याकरता अंकुर पाळणाघरही सुरू करण्यात आलं. या ठिकाणी सकस जेवण पुरवलं जातं तसेच मुलं सुरक्षित आणि संस्कारित वातावरणात या ठिकाणी मजेत राहतात. लॉकडाऊनच्या काळात मात्र संस्थेच्या विविध सामाजिक योजनांवर मोठा परिणाम झालाय. प्रत्यक्ष येऊ शकता येत नव्हतं तरीही प्रशिक्षण आभासी पद्धतीने देण्यात आलं. याशिवाय ऑनलाइन पद्धतीने आर्ट थेरपी या विषयावर १४ कार्यशाळा घेण्यात आल्या. यामध्ये देश-विदेशातील जवळजवळ ८०० महिलांनी सहभाग नोंदवला. यात महिलांना मानसिक स्वास्थ्य संतुलित राखण्याबाबत मार्गदर्शन देण्यात आलं. संस्थेतर्फे जुडो कराटेचे क्लासेस, योगासनाचे क्लासेसही चालवले जातात. नागपूरमधील ‘योगाभ्यासी मंडळ’ सकाळच्या वेळात इथे योगा वर्ग घेत असते. त्याचा फायदा ही अनेक ज्येष्ठ नागरिक घेत असतात. संस्कार वर्गही चालवले जातात, मुलांसाठी काही काळ प्ले ग्रुपही चालवला गेला, लहान मुलं इथे येऊन खेळत असत. मधल्या काळात सरकार बदललं की शैक्षणिक धोरण ही बदलतं त्यानुसार प्री प्रायमरी ट्रेनिंग कोर्सच सरकारने बंद केला तरीही न डगमगता हा कोर्स संस्थेने स्वतःच्या नावानेच सुरू ठेवला. महिला कला निकेतनच्या या कोर्सची प्रसिद्धी आणि दर्जा इतका चांगला होता की, महिला कला निकेतनचं प्रमाणपत्र पाहून इथे शिकलेल्या महिला आहेत नं, म्हणजे त्या नक्कीच चांगल्या प्रशिक्षित असल्या पाहिजेत, अशी सर्वत्र ख्याती पसरली होती. त्यामुळे हा कोर्स सुरूच राहिला. कोरोना काळात मात्र या अॅक्टिव्हिटी कमी झाल्या होत्या. या कोर्सबरोबरच पाळणाघर चालवलं जातं तसेच बालक मंदिरही चालवलं जातं. पाळणा घराला तर खूपच छान प्रतिसाद मिळत होता. कारोना काळापूर्वी इथे ३५ ते ४० मुलं दररोज असत. त्याशिवाय महिलांसाठी वेगवेगळ्या विषयांवरचे वर्कशॉप्स नियमित आयोजित केले जातात. डिझाईनिंग, पेंटिंग, भराडी गौर हा नागपूरकडे फुलांचा प्रकार आहे त्याचे प्रशिक्षण दिलं जातं. कोरोना काळामध्ये महिलांच्या हाताला काहीतरी काम मिळावं यासाठी
निकेतनमध्येच आठवडी बाजार सुरू केला गेला आहे आणि त्याला ग्राहक आणि विक्रेते दोघांकडूनही खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत २०० महिलांनी इथे स्टॉल्स उभे केले असून २००० ग्राहकांनी इथे वस्तूंची खरेदी केली आहे. अनेक महिला या काळात घाऊक माल घेऊन आपल्या घरून विक्री करत होत्या किंवा घरोघरी जाऊन विक्री करत होत्या; परंतु कोरोना काळात त्यांचा माल आहे तसाच नुसता घरात पडून होता. हे लक्षात आल्यावर त्यांना एक बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी हा आठवडी बाजार भरवण्यात येतोय. या महिलांना निकेतनच्या वतीने जागा देण्यात येते आणि महिला त्या ठिकाणी येऊन आपल्या वस्तूंची विक्री करतात.
आता हळूहळू कोरोना महामारीचा परिणाम कमी होऊ लागला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने हे सर्व कोर्स पुनरुज्जीवित करण्याचं काम सुरू आहे तसेच आणखी काही नवे उपक्रम सुरू करायचे आहेत. आपल्या देशामध्ये जवळजवळ ३६ वर्षांनी नवीन शैक्षणिक धोरण लागू होत आहे. या धोरणानुसार शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. अंकुर अॅक्टिव्हिटी सेंटरच्या माध्यमातून बालकांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने कार्य सुरू करायचं आहे तसंच आठवडी बाजारामध्ये येणाऱ्या महिला विक्रेत्यांना डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षण देण्याचाही विचार आहे. आज डिजिटल माध्यमातून मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होत असते. या किरकोळ विक्री करणाऱ्या महिलांना डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षण दिलं तर त्या त्यांच्या व्यापारामध्ये वृद्धी करू शकतात, हे लक्षात घेऊन अशा प्रकारचं आधुनिक प्रशिक्षण देण्याचा संस्थेचा मानस आहे. महिलांनी महिलांसाठी चालवलेल्या महिलांच्या या संस्थेत गरजू महिलांना सक्षम संस्कारक्षम करण्याचं काम अथकपणे संस्थेमार्फत सुरू आहे.