मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेकडून दुकाने आणि आस्थापनांवरील पाट्यांची पाहणी करायला सुरवात झाली आहे. सोमवार १० ऑक्टोबर रोजी २ हजार १५८ दुकानांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. या पैकी १ हजार ६३६ दुकाने, आस्थापनांवर मराठीत पाट्या बसवण्यात आल्या आहेत. ५२२ दुकाने, आस्थापनांवर अद्यापही मराठी पाट्या नाहीत.
मुंबई महापालिकेने दुकाने आणि आस्थापानांवर मराठी पाट्या नसलेल्या मालकांवर कारवाई केली जाणार असून सुरुवातीला पालिकेकडून दुकानांची पाहणी सुरू झाली आहे. सोमवार १० ऑक्टोबरपासून पालिकेने दुकानांच्या पाट्यांची तपासणी करण्यास सुरवात केली असून सोमवारपर्यंत एकूण २ हजार १५८ दुकानांच्या तपासण्या केल्या आहेत. यात १ हजार ६३६ दुकानांवर मराठी पाट्या लावण्यात आल्या आहेत.
५२२ दुकानांवर अद्यापही मराठी पाट्या नाहीत, त्यामुळे महापालिकेने पालिकेच्या नियमानुसार ७ दिवसांची नोटीस दिली आहे. या नोटीसीनंतरही मराठी नाम फलक बसवण्यात आले नाही, तर पालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान पालिकेच्या कारवाईला स्थगिती देण्यासाठी व्यापारी संघटना सर्वोच न्यायालयात गेली आहे, असे असताना पालिकेने मात्र मुंबईतील दुकानांची तपासणी सुरू केली आहे.