Monday, January 20, 2025
Homeदेशझटपट डिजिटल पेमेंटसाठी भारत जगात अव्वल : नरेंद्र मोदी

झटपट डिजिटल पेमेंटसाठी भारत जगात अव्वल : नरेंद्र मोदी

हैदराबाद (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी हैदराबाद येथे ‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड जिओस्पेशियल इंटरनॅशनल काँग्रेस’चे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, ‘जगात कोणत्याही संकटाच्या वेळी एकमेकांना मदत करण्यासाठी संस्थात्मक दृष्टीकोन आवश्यक आहे. युनायटेड नेशन्ससारख्या जागतिक संस्था प्रत्येक क्षेत्रात शेवटच्या टप्प्यापर्यंत संसाधने नेण्यास सक्षम आहेत. या पाच दिवसीय परिषदेत ११५ देशांतील ५५० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. हे प्रतिनिधी एकात्मिक भूस्थानिक माहिती व्यवस्थापन आणि त्याच्या क्षमतांच्या विकास आणि बळकटीकरणाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करतील.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले, ‘झटपट डिजिटल पेमेंटसाठी भारत जगात अव्वल आहे. अगदी लहान विक्रेतेही डिजिटल पेमेंट स्वीकारतात किंवा पसंत करतात. भारत हा एक तरुण देश आहे, ज्याची काहीतरी नवीन विचार करण्याची भावना आश्चर्यकारक आहे. आम्ही जगातील शीर्ष स्टार्टअप हब आहोत. २०२१ पासून देशातील युनिकॉर्न स्टार्ट-अप्सची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. याचे कारण भारतातील तरुण लोकसंख्या आहे,

ते पुढे म्हणतात की, भारताच्या विकासात तंत्रज्ञान आणि प्रतिभा, या दोन स्तंभांचा महत्वाचा वाटा आहे. तंत्रज्ञान हा बदलाचा आधार आहे. तंत्रज्ञान हे सर्वसमावेशक घटक आहे. डिजिटलायझेशनचा लोकांना कसा फायदा होतो, याचे ‘पीएम स्वामीत्व योजना’ हे उदाहरण आहे. भारत हे नवीन कलागुण असलेले तरुण राष्ट्र आहे. कोरोना महामारीने आपल्याला शिकवले आहे की, सर्वांना सोबत घेऊन एकत्र आले पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, ‘रांगेत उभ्या असलेल्या शेवटच्या व्यक्तीला सक्षम बनविण्याचे उद्दिष्ट साकार करण्यासाठी देश काम करत आहे. देशात ४५ कोटी लोकांना बँकिंग सेवा पुरविण्यात आली. ही लोकसंख्या अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. विमा सुविधा नसलेल्या १३.५५ दशलक्ष लोकांचा विमा उतरवण्यात आला आणि ही लोकसंख्या फ्रान्सच्या लोकसंख्येइतकी आहे. अकरा कोटी कुटुंबांना स्वच्छता सुविधा आणि ६ कोटींहून अधिक कुटुंबांना नळाचे पाणी देऊन भारत हे सुनिश्चित करत आहे की कोणीही मागे राहणार नाही.’ अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -