सिडनी (वृत्तसंस्था): जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाने ऑस्ट्रेलियात आयोजित केलेल्या इनडोअर क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत मंगळवारी भारताने यूएईवर १७ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १६ षटकांत ११३ धावा केल्या. यूएईला ९६ धावांपर्यंतच मजल मारता आली.
१६ षटकांच्या सामन्यात भारताने चांगली सुरुवात केली. भारताच्या चारही जोड्यांनी अनुक्रमे ३१, १७, ३६ व २९ धावा करत एकूण ११३ धावा जमवल्या. भारतीय गोलंदाजांनी यूएईच्या चारही जोड्यांना अनुक्रमे २३, ३८, २१ व १४ धावांवर रोखले. या सामन्यात यूएईने भारताला जोरदार लढत दिली, मात्र भारताने १७ धावांनी विजय साजरा केला. भारताच्या गोलंदाजांनी १६ षटकांत यूएईच्या एकूण ५ फलंदाजांना बाद केल्याने यूएईच्या धावाफलकतून २५ धावा कमी करता आल्या. यूएईच्या गोलंदाजांनीही १६ षटकांत भारताच्या एकूण ५ फलंदाजांना बाद केल्याने भारताच्या धावाफलकातून सुध्दा २५ धावा कमी केल्या. एकूणच भारताची फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अतिशय उच्च दर्जाचे झाले. त्यामुळेच कडव्या प्रतिकारनंतर सुध्दा भारताला विजय प्राप्त करता आला.
भारतातर्फे पहिल्या जोडीने दैविक राय (२३) व धनुश भास्कर (८) यांनी करून दिलेल्या चांगल्या सुरुवातीनंतर दुसऱ्या जोडीतील विजय हनुमंतरायाप्पा (१९) व अफ्रोज पाशा (-२), तिसऱ्या जोडीतील सूरज रेड्डी (१७) व अरिज अजीज (१९) व चौथ्या व शेवटच्या जोडीतील नमशीद व्हि. (१६) व मोहसिन नादाम्मल (१३) यांनी भारतासाठी जोरदार कामगिरीची नोंद केली.
यूएईच्या पहिल्या जोडीमधील आकीब मलीक (८) व एन. नासिर (१५), दुसऱ्या जोडीमधील विक्रांत शेट्टी (२३) व प्रेम व्यास (१५), तिसऱ्या जोडीतील जय जोशी (८), व दिल्लसारा सासंका (१३) तर शेवटच्या जोडीतील प्रशांथ कुमारा (१३) व ईसूरू उमेश (१) यांनी कडवी लढत दिली.
भारताच्या सूरज रेड्डीने २, मोहसिन नादाम्मल, विजय हनुमंतरायाप्पा व अफ्रोज पाशा यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. तर यूएईच्या दिल्लसारा सासंकाने ३ व जय जोशीने २ फलंदाज बाद केले. या सामन्यात प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार यूएईच्या दिल्लसारा सासंकाला देऊन गौरवण्यात आले.