गुना (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशाच्या गुनातील एका हातपंपाला पाणी नव्हे तर दारू येते. अवैध मद्यविक्री करणाऱ्यांचा हा कारनामा पोलिसांनी गुनाच्या २ गावांत मारलेल्या धाडीनंतर उजेडात आला. पोलिसांनी घटनास्थळी आढळलेला हातपंप चालवल्यानंतर त्यातून दारू बाहेर पडली. त्यानंतर त्यांनी तिथे खोदकाम केले असता अवैध दारूने भरलेल्या टाक्या आढळल्या. या टाक्या जमिनीखाली ७ फूट खोल पुरण्यात आल्या होत्या. कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दारू जप्त केली आहे.
गुनाच्या चांचोडा व राघोगड या २ गावांतील ही घटना आहे. येथील गावठी दारूचे उत्पादन घेतले जाते. अवैध मद्यविक्री करणाऱ्यांनी जमिनीखाली ७ फूट खोल काही टाक्या गाडल्या आहेत. त्यावर हातपंप लावलेत. त्यातून दारू बाहेर पडते. त्यातून निघालेली दारू पॉलीबॅगमध्ये भरून विकली जाते. पोलिसानी सोमवारी अवैध दारूच्या २ ठिकाणांवर छापेमारी केली. यावेळी हजारो लीटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. पण आरोपी पसार झाले. पोलिसांनी या प्रकरणी ८ आरोपींविरोधात २ पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल केले आहेत.
भानपुराचे चांचोडा एसडीओपी दिव्य राजावत व साकोन्यातील राघोडचे एसडीओपी जी.डी. शर्मा यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने ही छापेमारी केली. पोलीस पाहताच आरोपी पसार झाले. घटनास्थळी झोपडीसारखी घरे होती. जवळच एक पाण्याची टाकी होती. पोलिसांनी घटनास्थळी खोदकाम केले असता जमिनीतून लागोपाठ अनेक टाक्या बाहेर आल्या.
चांचोडा ठाण्याचे प्रभारी रवी कुमार गुप्ता यांनी सांगितले की, टाक्यांपासून काही अंतरावर हातपंप लावण्यात आला होता. या हातपंपाद्वारे या टाक्यांतील दारू बाहेर काढली जात होती. त्यानंतर ती प्लॅस्टीकच्या छोट्या थैल्यांत घालून विक्री केली जाते. एका पॅकेटची किंमत जवळपास ४० रुपये असते. याशिवाय ५-५ लीटरच्या कॅनद्वारेही दारू विक्री केली जाते. दारू काढण्यासाठी हातपंपाचा वापर केला जातो. त्याच्याखाली ८-१० फुटांचा पाइप जोडलेला असतो. पाइपला जमिनीच्या आत गाडलेल्या ड्रमला जोडलेले असते. दुसरा पाइप बाहेर ठेवलेल्या छोट्या ड्रमला लावून त्यात दारू भरली जाते. हा हातपंप पाण्याच्या हातपंपासारखाच असतो.