विरार (प्रतिनिधी) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर नुकतेच काही दिवसांपूर्वी सळयांनी भरलेला एक ट्रक दरोडेखोरांनी पळवून नेल्याची घटना ताजी असतानाच, आता पुन्हा याच महामार्गावर मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच १ कोटी ३९ हजार रूपयांच्या सिगारेटच्या मुद्देमालाने भरलेला ट्रक दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस अज्ञात दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.
नवी मुंबईतील रबाळे येथून सिगारटचे तयार उत्पादन असलेला सुमारे १ कोटी ३९ हजारांचा मुद्देमाल अज्ञात दरोडेखोरांनी ट्रकचालकासोबत पळवून नेला. मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सकवार गावच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास चारचाकी गाडीने आलेल्या अज्ञात दरोडेखोरांनी हा ट्रक लंपास केला. ट्रकचालकाला नंतर राष्ट्रीय महामार्गावर सोडून दरोडेखोरांनी हा ट्रक पळवून नेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महामार्गावर सध्या चालत्या ट्रकवर दरोडा टाकून तो पळवून नेणारी टोळी सक्रिय झाली आहे. पोलिसांनी महामार्गावर जागता पहारा ठेवण्याची सध्यस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. अन्यथा एखाद्या दरोड्यात निरपराध वाहनचालकाचा जीव जाण्याचा धोका असल्याचे सांगण्यात येत आहे.