Wednesday, March 26, 2025
Homeसंपादकीयअग्रलेख‘नेताजी’ हरपले

‘नेताजी’ हरपले

जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवाला मृत्यू हा अटळच असतो. कोणीही अमर ठरत नाही. तो निसर्ग चक्राचाच एक भाग आहे. कोणीही त्याला अपवाद ठरू शकत नाही. कोणी आल्या-गेल्याने सृष्टीच्या जीवनक्रमावर काहीही फरक पडत नाही. कविवर्य भा. रा. तांबे यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास, ‘रामकृष्णही आले-गेले, त्याविण जग का ओसची पडले.’ आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुलामयसिंह गेले, नेताजीही हरपले, समाजवादी प्रवाहातील मुलायम तारा निखळला. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे गुरुग्राममधील रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झाले आहे. गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते; परंतु वयाच्या ८२ व्या वर्षी मुलायमसिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. ३ वर्षांपासून मुलायमसिंह यादव यांची तब्येत खराब होती. महिन्यातून २-३ वेळा ते हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल व्हायचे; परंतु ऑगस्ट महिन्यापासून मुलायम यांची तब्येत खालावत चालली होती. २२ ऑगस्टपासून ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते.

२ ऑक्टोबरला दुपारी त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने, आयसीयूमध्ये हलवण्यात आले. त्यांची ऑक्सिजन पातळी आणि रक्तदाब कमी झाला होता. मुलायमसिंह यादव यांना श्वसनाचा-रक्तदाबाचा त्रास होता. मुलायमसिंह यादव यांना युरिन इन्फेक्शनची समस्या होती. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन उत्तर प्रदेशसारख्या महाकाय राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळविणे ही अशक्यप्राय बाब आहे. मुलायमसिंह यांनी ती आपल्या कार्याच्या, जनसंपर्काच्या पाठबळावर शक्य करून दाखविली. मुलायमसिंह हे उत्तर भारतातील मोठे समाजवादी आणि शेतकरी नेते आहेत. एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलायमसिंह यांनी उत्तर प्रदेशात आमदार म्हणून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. अल्पावधीतच संपूर्ण उत्तर प्रदेशात मुलायमसिंहांचा प्रभाव दिसून आला व त्यांनी आपल्या कार्यातून आपल्या मागे जनाधार उभा केला. मुलायमसिंह यांनी उत्तर प्रदेशातील इतर मागासवर्गीय समाजाचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी महत्त्वाचे काम केले. सामाजिक जाणिवेमुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात ओबीसींना महत्त्वाचे स्थान आहे. समाजवादी नेते रामसेवक यांच्या आशीर्वादाने मुलायमसिंह १९६७ मध्ये पहिल्यांदा विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि मंत्री झाले. १९९२ मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. ५ डिसेंबर १९८९ ते २४ जानेवारी १९९१, ५ डिसेंबर १९९३ ते ३ जून १९९६ आणि २९ ऑगस्ट २००३ ते ११ मे २००७ या तीन वेळा ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.

मुलायमसिंह यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९३९ साली उत्तर प्रदेशमधील इटावा येथे झाला. त्यांनी अगदी तरुण वयापासून राजकारणात सक्रिय सहभाग घेतला होता. मुलायमसिंह यादव यांनी तीन वेळा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. तसेच १९९६ ते १९९८ दरम्यान ते केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्रीही होते. १९९२ साली समाजवादी पक्षाची स्थापना केल्यानंतर वर्षभरात म्हणजेच ५ डिसेंबर १९९३ रोजी मुलायमसिंह दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. पुढील ११ वर्षांमध्ये सातत्याने संघर्ष करत त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली. २९ ऑगस्ट २००३ रोजी यांनी तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच म्हणजेच चार वर्ष झाल्यानंतर ११ मे २००७ रोजी पदाचा राजीनामा दिला. उत्तर प्रदेशच्या राजकारणावर आपली छाप पाडणाऱ्या मुलायमसिंह यादव यांनी केंद्रामध्येही संरक्षण मंत्रीपदासारखी महत्त्वाची भूमिका पार पाडली. एच. डी. देवेगौडा आणि त्यानंतर इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना मुलायमसिंह यादव हे संरक्षण मंत्री होते. १ जून १९९६ ते १९ मार्च १९९८ दरम्यान त्यांनी या पदाची जबाबदारी पार पाडली.

मुलायमसिंह हे उत्तर प्रदेशातील यादव समाजाचे सर्वात मोठे नेते म्हणून ओळखले जातात. मुलायमसिंह यांनी उत्तर प्रदेशमध्ये सामाजिक सलोखा राखण्यात मोठे योगदान दिले. मुलायमसिंह यांची एक धर्मनिरपेक्ष नेता अशी ओळख आहे. त्यांचा पक्ष समाजवादी पक्ष हा उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा पक्ष मानला जातो. उत्तर प्रदेशच्या राजकीय जगतात मुलायमसिंह यादव यांना प्रेमाने नेताजी म्हटले जाते. २०१२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले. उत्तर प्रदेशात सपा स्वबळावर सरकार स्थापन करण्याची ही पहिलीच वेळ होती. नेताजींचे पुत्र आणि सपाचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश यादव यांनी बसपा सरकारविरोधात भ्रष्टाचाराचा मुद्दा जोरात मांडला आणि राज्याच्या विकासाचा अजेंडा समोर ठेवला. अखिलेश यादव यांच्या विकासाच्या आश्वासनांनी प्रभावित होऊन त्यांना संपूर्ण राज्यात व्यापक जनसमर्थन मिळाले. निवडणुकीनंतर जेव्हा नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा वरिष्ठ सहकाऱ्यांशी चर्चा करून नेताजींनी अखिलेश यादव यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केले. अखिलेश यादव हे मुलायमसिंह यांचे पुत्र आहेत. अखिलेश यादव यांनी नेताजींनी दाखवलेल्या मार्गावर चालत उत्तर प्रदेशला विकासाच्या मार्गावर नेले. मुलायम यांच्या निधनामुळे देशाच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे. समाजवादी विचारसरणीचे महत्त्वपूर्ण पर्व हरपले आहे. उत्तर प्रदेशातील तळागाळातील जनतेचे नेतृत्व आज निघून गेले असल्याने उत्तर प्रदेशातील जनता शोकाकुल झालेली आहे. मोदी लाटेमुळे मुलायमसिंह उत्तर प्रदेशच्या राजकारणात काहीसे मागे पडले असले तरी त्यांचे पुत्र अखिलेश यांनी ती पोकळी भरून काढली आहे. मुलायम हे देशातील मातब्बर नेतृत्वापैकी एक होते. राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणात त्यांना एक मानाचे स्थान होते. मुलायमसिंह यांच्याकडे एक विचारधारा होती, त्यांच्या कार्याला वैचारिक अधिष्ठान होते; परंतु आता ते इतिहासजमा होणार असून मुलायम यांचे कार्यच त्यांची आठवण करून देणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -