नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी, उत्पादन शुल्कमंत्री आणि शिंदे गटाचे शंभुराजे देसाई यांनी राज्यातील मॉलमध्ये वाइनविक्री सुरूवात होणार असे संकेत दिले होते. भाजपने त्यावेळी विरोध दर्शवला. मात्र, देशातील एका राज्यात किराणा दुकानात बिअर विक्रीला परवानगी देण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये अधिकृत किराणा दुकानांमध्ये बिअर उपलब्ध होणार आहे. काश्मीरच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी सोमवारी याबाबतच्या अर्जाला मान्यता दिली आहे. आता जम्मू-काश्मीरच्या शहरी भागातील अधिकृत डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये बिअर आणि इतर रेडी टू ड्रिंक प्रकारातील शितपेये उपलब्ध होणार आहेत. मात्र, अशा प्रकारच्या स्टोअर्ससाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.
जम्मू आणि श्रीनगरसाठी एखाद्या व्यावसायिक संकुलातील १२०० चौरस फूट जागेचा गाळा, वार्षिक पाच कोटी उत्पन्न अशा अटी ठेवण्यात आल्या आहेत. तर इतर शहरी भागासाठी २ कोटी इतकी अट ठेवण्यात आली आहे.