सीमा दाते
मुंबईची लोकल म्हणजेच मुंबईची जीवनवाहिनी, खरं तर ही लोकल चालते म्हणून मुंबई सुरू असते, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. ज्यावेळी लोकल सेवा खंडित होते, त्यावेळी जणू काही मुंबईच थांबते, याचा अनुभव आपण सर्वांनीच कोरोना काळात पाहिला आहेच. लॉकडाऊनमध्ये लोकल सेवा बंद केल्यानंतर जणू काही मुंबईच थांबली होती. लोकल बंद असल्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लोकांना जाता येत नव्हते. मुंबई बाहेरील म्हणजेच ठाणे, कल्याण, बदलापूर, पनवेल, वसई, विरार येथे राहणारे, पण कामानिमित्त मुंबईला येणारे लोकही येऊ शकत नव्हते, त्यामुळे लोकल ही मुंबईसाठी, मुंबईकरांसठी किती महत्त्वाची आहे ते कळले. पण गेले कित्येक वर्षे या लोकलच्या समस्या काही सुटत नाहीत. रेल्वे प्रशासनाकडून नवीन लोकल आणल्या जातात लोकलच्या फेऱ्या वाढवल्या जातात, मात्र इतकं सगळं करूनही लोकलच्या गर्दीवर मात्र तीळभरही फरक पडत नाही.
सध्याच्या परिस्थितीत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मिळून ७५ लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात. मात्र ही संख्या ७५ लाख असली तरी यापेक्षाही जास्त प्रवासी प्रवास करत असतात. बरं ही गर्दी कधी कमीदेखील होत नाही. दिवसेंदिवस ती वाढत जाते, त्यातच आता रेल्वेने सुरू केलेल्या एसी लोकलमुळे तर मध्य रेल्वेवरची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली. रेल्वे प्रशासनाकडून सामान्य लोकलच्या वेळेत एसी लोकलचे वेळापत्रक करण्यात आले. त्या लोकलच्या वेळेत एसी लोकल सुरू झाल्या. त्यामुळे एका लोकलवर गर्दीचा भार वाढू लागला. एका लोकलच्या गर्दीत दोन लोकलची गर्दी व्हायला लागली. परिणामी मुंबईकर, चाकरमानी मात्र त्रस्त व्हायला लागला. बरं जवळच्या लोकल असतील, तर एक वेळेस ठीक आहे. पण बदलापूर, खोपोली, कर्जत, अंबरनाथ यांसारख्या लोकलमध्ये साधं श्वास घ्यायलाही जागा नाही.
विशेष म्हणजे ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाने व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं आहे, अन्यथा अशा गर्दीचा उद्रेक हा बुधवारी झालेल्या घटनेत रूपांतर होतो. बरं ही हाणामारी इतर कारणावरून झाली असली तरी लोकलमध्ये रोज उभे राहण्यावरून, बसण्यावरून वादविवाद, बाचाबाची होत असतेच. कधी कधी ही बाचाबाची इतकी भयंकर असते की, याचे रूपांतर मारामारीत होते. हे केवळ जनरल डब्यातच नाही, तर महिला डब्यात तर जास्तच वाद होत असतात. विशेष म्हणजे रोज प्रवास करणाऱ्यांनी बनवलेले स्वतःचे नवीन नियम हे नियम वादासाठी पुरेसे आहे. तीनजण बसण्याची जागा असताना चौथ्या प्रवाश्यासाठी जागा झालीच पाहिजे, जर बसलेल्या तिघांकडून चौथ्यासाठी जागा होत नसेल, तर वादावादी सुरू. उभ्या असलेल्या व्यक्तीला बाकावर बसायचे झाल्यास त्याने चौथ्याच सीटवर बसायचे, असे वेगवेगळे नियम लोकलमध्ये पाहायला मिळतात. बरं जर कोणी या नियमापासून अनभिज्ञ असेल, तर मात्र त्या व्यक्तीची खैर नाही. अशी काहीशी स्थिती लोकलमध्ये असते. बरं असे प्रकार घडताना पोलीस असतील तरी गर्दीमुळे ते त्या जागेवरदेखील पोहोचू शकत नाही. त्यामुळे या सगळ्यांवर रामबाण उपाय आहे, तो म्हणजे गर्दीचे नियोजन, याबाबत नियोजन करणे अगदीच कठीण आहे. मात्र तरीही नवीन लोकल, लोकलच्या जास्त फेऱ्या वाढवल्यामुळे कदाचित गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि सामन्य चाकरमान्यांना याचा फायदा होईल.
सध्या मध्य रेल्वेचा पसारा सीएसएमटी ते कसारा, खोपोली, हार्बरवर पनवेल आणि पश्चिम मार्गावर चर्चगेट ते डहाणूपर्यंत पोहोचला आहे. येथे राहणाऱ्या नागरिकांसाठी मुंबईला आपल्या नोकरीवर जाण्यासाठी खूप मदत होते. लोकलमुळे एक ठिकाण जणू दुसऱ्या ठिकाणच्या हातात हात धरून असल्यासारखं वाटतं. सगळ्यात स्वस्त वाहतूक सेवा लोकलच देते, त्यामुळे रेल्वे प्रशासनाचे करावे तितके कौतुक कमीच आहे. एसी लोकल ही सुरू केल्या त्या लोकांच्या फायद्यासाठी, त्याचे तिकीट दरही सामान्यांना परवडता यावे म्हणून कमी केले, प्रत्येक नागरिकासाठी ही लोकल म्हणजे हवी हवीशी वाटते. पण सध्याच्या गर्दीमुळे मात्र मुंबईकर, मुंबई बाहेर राहणारा चाकरमानी वैतागला आहे. रोज गर्दीमध्ये लोकलच्या दरवाजावर लटकून अपघात होणाऱ्यांची संख्या वेगळीच त्यामुळे लोकलच्या गर्दीबाबत वेळीच मार्ग निघणे गरजेचे आहे. अन्यथा, या गर्दीचा उद्रेक भविष्यात वेगळीच काहीतरी घटना घडवायला कारणीभूत ठरू शकते.