Sunday, April 27, 2025
Homeमहामुंबई‘चिन्ह गोठवले यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही’ : देवेंद्र फडणवीस

‘चिन्ह गोठवले यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही’ : देवेंद्र फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी) : ‘निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठविण्याचे अंतरिम आदेश दिले असून, यात आपल्याला काहीही आश्चर्य वाटले नाही’, अशी सहज प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ‘यापूर्वी गेल्या २५ वर्षांमध्ये कोणत्याही राज्यात एखाद्या पक्षात फूट पडली आणि निवडणूक आयोगासमोर ते प्रकरण गेले, तेव्हा निवडणूक आयोगाने अंतरिम आदेश देत चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवले आहे. त्यानंतर त्यावर सुनावणी घेऊन कायद्यानुसार, ज्याचा हक्क असतो, त्याला ते मिळते. आपल्याकडे निवडणूक असल्यामुळे तसे करणे गरजेचे होते. मला अपेक्षा आहे की, जेव्हा निवडणूक आयोग अंतिम निर्णय देईल, तेव्हा एकनाथ शिंदेंची बाजू वरचढ ठरेल’, असेही ते म्हणाले.

धनुष्यबाण हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर त्यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या सगळ्यामागे भाजप असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे, तर दुसरीकडे भाजपकडून आणि शिंदे गटाकडूनही शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेमध्ये मोदींविषयी केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात माध्यमांनी फडणवीसांना विचारणा केली असता, त्यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले.

ठाकरेंनी रविवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना ‘नरेंद्र मोदी घासले गेलेले नाणे आहेत’ असा उल्लेख केला. याबाबत भाजपकडून आक्षेप नोंदवण्यात येत असून फडणवीस यांनी ठाकरेंना खोचक शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे यांच्या विधानाविषयी विचारणा केली असता फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत प्रतिक्रिया दिली. ‘बहुतेक उद्धव ठाकरे हे विसरलेत की, नोटबंदीनंतरच्या सगळ्या निवडणुका ते मोदींच्या नाण्यावरच जिंकले आहेत. त्यांचे १८ खासदार आणि ५६ आमदार हे मोदीजींचे नाणे दाखवूनच निवडून आले. त्यामुळे बाळासाहेब हे नेहमीच श्रद्धेय राहतील. पण देशात मोदींचे नाणे चालतच राहील’, असे फडणवीस म्हणाले.

ज्याला जे वाटते ते तो बोलतोय…

दरम्यान, राज्यात घडत असलेल्या या सगळ्या घडामोडींमागे भाजपा आणि देवेंद्र फडणवीस असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात येत आहे. शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी तसा थेट आरोपच केला आहे. यासंदर्भात विचारणा केली असता फडणवीसांनी त्यावर टोला लगावला. ‘बोलायला आपण काहीही बोलू शकतो. एका चॅनलवर कुणीतरी म्हटले आहे की शिवसेनेने सांगितलेल्या नव्या नावांच्या मागे शरद पवार आहेत. ज्याला जे वाटते ते तो बोलतो’, असे फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरील संवादामध्ये ‘ही शेवटची निवडणूक असल्याप्रमाणे लढा’ असे आवाहन केल्याचे म्हटले जात आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, ‘मागच्या वेळी मी म्हटले होते की प्रत्येक निवडणूक शेवटची म्हणून लढा, तेव्हा त्यांना त्याचे फारच वाईट वाटले होते. त्यांनी माझीच शेवटची निवडणूक ठरवली होती. मी त्यावर काहीही प्रतिक्रिया देणार नाही. ज्याला जशी निवडणूक लढायची, तशी लढवा’.

ठाकरे गटाकडून तीन चिन्हं…

दरम्यान, निवडणूक आयोगाने धनुष्यबाण  हे चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवल्यानंतर ठाकरे गटाकडून तीन निवडणूक चिन्ह आणि पक्षासाठी तीन नावे निश्चित करण्यात आली आहेत. ही नावे आणि निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली आहेत. त्यात उगवता सूर्य, त्रिशूळ आणि मशाल या चिन्हांचा समावेश आहे.

निर्णयामुळे गळा काढू नये : केसरकर

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर लोकांनी गळा काढू नये. मुळात हा आमच्यावर झालेला अन्याय आहे. बहुमत असूनही आमचा दावा नाकारला गेला. त्यांनी कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे वेळेत निर्णय होऊ शकला नाही, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करू नका : राज ठाकरे

धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले गेले असले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली जाऊ नये, असे आवाहन मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे.

शिवसेना पुन्हा उभारी घेईल : शरद पवार

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवले असले तरी शिवसेना पुन्हा नव्याने उभारी घेईल, असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -