नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातील एकमेव शाकाहारी मगरीचे निधन झाले आहे. लाखो वर्षांपासून पृथ्वीवर राहणारी मगर मांसाहारी प्राणी आहे, पण भारतात एक अशी मगर होती, जी पूर्णपणे शाकाहारी होती. दक्षिण भारतातील एका मंदिरात ही शाकाहीर मगर राहायची. बाबिया असे या मगरीचे नाव होते. ९ ऑक्टोबर रोजी बाबियाचा मृत्यू झाला.
मगर आपल्या जबड्यात आलेल्या शिकारीला कधीही जिवंत जाऊ देत नाही. एखाद्या प्राणी मगरीच्या तावडीत सापडला आणि तो जिवंत परतला, असे क्वचितच पाहायला मिळते. पण, बाबीया पूर्णपणे शाकाहारी आणि माणसाळलेली होती. ती कधीही कोणत्या व्यक्तीवर किंवा प्राण्यावर हल्ला करत नसे. ती मांसाहाराऐवजी मंदिरातील प्रसाद खायची.
उत्तर केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील अनंतपुरा नावाच्या एका छोट्याशा गावात श्री अनंत पद्मनाभ स्वामी मंदिराच्या तलावात बाबिया मगर राहायची. सुमारे ७५ वर्षांपासून बाबियाचे तलावात वास्तव्य होते. मंदिराचे पुजारी बाबिला दिवसातून दोनदा खाऊ घालायचे. मंदिराचा प्रसाद खाऊन बाबिया जगायची. पुजार्याची आणि तिची एक अनोखी केमिस्ट्री होती. मंदिराच्या तलावात पुरेसे मासे होते, पण बाबियाने कधीही मासे खाल्ले नसल्याचा दावा मंदिरातील कर्मचाऱ्याने केला आहे.
भाविक हाताने अन्न द्यायचे-मंदिरातील पुजारी बाबियाला दिवसातून दोनवेळा प्रसाद खाऊ घालायचे. याशिाय, मंदिरात येणारे भाविकही तिला तांदुळ आणि गुळ खायला द्यायचे. बाबिया हे शाकाहारी अन्न मोठ्या आनंदाने खायची. विशेष म्हणजे, बाबियाने इतक्या वर्षात एकाही भाविकावर हल्ला केला नाही. भूक लागायची तेव्हा बाबिया तलावातून बाहेर यायची. एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे ती मंदिरात फिरायची. कोणीही तिला घाबरत नसे.