Tuesday, April 29, 2025

विदेशमहत्वाची बातमी

रशियाने डागली युक्रेनवर ७५ क्षेपणास्त्रे

रशियाने डागली युक्रेनवर ७५ क्षेपणास्त्रे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले रशिया आणि युक्रेन युद्ध थांबायचे नाव घेत नाही. अनेक देशांनी प्रयत्न करुनही, युद्ध सुरूच आहे. यातच आता रशिया पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. रशियाने युक्रेनची राजधानी कीववर जोरदार बॉम्बहल्ला केला आहे. क्रिमिया ब्रिजवर युक्रेनी हल्ल्यानंतर रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर क्षेपणास्त्रे डागली.

युक्रेनच्या म्हणण्यानुसार, रशियाने २४ तासांत ७५ क्षेपणास्त्रे डागली आहेत. एजन्सी रिपोर्टनुसार, रशियन हल्ल्यात ८ लोकांचा मृत्यू झाला, तर २४ हून अधिक जण जखमी झाले आहेत. रशियन हल्ल्यात लिव्ह, पोल्टावा, खार्किव, कीव या शहरांतील अनेक भाग जळून खाक झाले आहेत. या शहरांमधील इंटरनेट सेवाही बंद झाली आहे. या हल्ल्यात डझनहून अधिक गाड्या जळून खाक झाल्या आहेत.

कोणत्याही परिस्थितीत आत्मसमर्पण करणार नसल्याचे युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. ‘आम्ही लढू, आम्ही कधीही आत्मसमर्पण करणार नाही,’ असे ट्विट युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने केले आहे. युक्रेनचे संरक्षण मंत्री म्हणाले की, 'शत्रूच्या क्षेपणास्त्रांनी आमच्या राजधानीच्या हृदयावर हल्ला केला, तरीदेखील आमचे धैर्य नष्ट होणार नाही.' याशिवाय, 'रशियाने युक्रेनवर ७५ क्षेपणास्त्र हल्ले केले असून त्यापैकी ४१ क्षेपणास्त्रांना हाणून पाडले आहे,' अशी माहिती युक्रेनच्या आर्म्स फोर्सेसचे कमांडर-इन-चीफ जनरल व्हॅलेरी यांनी दिली आहे.

Comments
Add Comment